वेळोवेळी निवेदने देऊनही परिणाम शून्य, तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
खानापूरहून सकाळच्या वेळी बेळगावला जाण्यासाठी बससेवा अपुऱया असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थीवर्गाचे अतोनात हाल होत आहेत. यासंदर्भात आगारप्रमुखांना वेळोवेळी निवेदने देऊनही बससेवा सुरू केल्या जात नाहीत. यामुळे विद्यार्थीवर्गाला वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आगारप्रमुखांनी याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थीवर्गाने दिला आहे.
खानापूर शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बेळगावातील विविध महाविद्यालयात तसेच तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. यामुळे सकाळी 7 ते 9 या वेळेत बेळगावला जाण्यासाठी राजा शिवछत्रपती चौकातील जुन्या बसस्थानकावर तसेच मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बरीच गर्दी असते.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील सकाळच्यावेळी बेळगावला थेट बससेवा नसल्याने केवळ खानापूरपर्यंतच ग्रामीण भागातून बस येतात. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील त्या बसमधून खानापूरपर्यंत येतात. येथून बेळगावला जाण्यासाठी सकाळी 7 ते 9 या वेळेत खानापूरहून बेळगावला प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाला एक बस सुरू ठेवणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेपूर्वी बेळगावला पोहचता येऊ शकते.
यापूर्वी 7 ते 9 या वेळेत खानापूरहून बेळगावला जाण्यासाठी बऱयाच बससेवा सुरू होत्या. उन्हाळी सुट्टी काळात ग्रामीण भागातील अनेक बससेवा बंद करण्यात आल्या. तसेच वस्तीसाठी ग्रामीण भागात गेलेल्या बसही थेट बेळगावपर्यंत जात होत्या. यामुळे विद्यार्थीवर्ग महाविद्यालयाच्या वेळेत बेळगावला पोहचत होता. पण त्याही बससेवा सुट्टी काळात बंद होत्या. आता उन्हाळा संपून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. यामुळे उन्हाळी सुट्टीत बंद ठेवण्यात आलेल्या सर्व बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सकाळी 7 ते 9 या वेळेत सलग बस सोडाव्यात. तसेच ग्रामीण भागात वस्तीला गेलेल्या बसदेखील फक्त खानापूरपर्यंत न सोडता त्या बेळगावपर्यंत सोडाव्यात, अशी मागणी केली जात आहे. तसेच सायंकाळी बेळगावातील महाविद्यालये सुटल्यानंतर खानापूरकडे येणाऱया विद्यार्थ्यांना अपुऱया बससेवेअभावी मोठी अडचण होत आहे. यामुळे सायं. 4.30 ते 6 या वेळेत सीबीटी ते खानापूर व धर्मवीर संभाजी चौक ते खानापूर या मार्गावर विशेष बससेवा सुरू करण्याची मागणीही विद्यार्थीवर्गातून केली जात आहे.
बिडी-बेळगाव मार्गावर जादा बस सोडाव्यात
बिडी-बेळगाव मार्गावर शालेय विद्यार्थी व नागरिकांना बसअभावी लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागतो. या प्रवासात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वेळेअभावी लोंबकळत बसमधून प्रवास करण्याची परिस्थिती विद्यार्थी व प्रवासीवर्गावर आली आहे.
या मार्गावर दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक प्रवास करतात. बिडी ते बेळगाव बस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या बसमधूनच अक्षरशः दरवाजाच्या खिडकीचे गज धरून प्रवास करण्याची वेळ येत आहे. एक्सप्रेस बसमधून विद्यार्थ्यांना अनेकदा प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना लोकल बसवरच अवलंबून राहावे लागते.
सकाळच्या वेळी तर बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबण्यात येतात. कितीही त्रास झाले तरी शाळेचे तास चुकतील, या चिंतेने विद्यार्थी या बसमध्ये चढतात. याकरिता बिडी, बेळगाव मार्गावर सकाळी 7 ते 10 तसेच सायंकाळी 5 ते 9 या वेळेत विशेष बससेवा सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.









