खानापूर : खानापूर-बेळगाव मित्रमंडळ पुणे आयोजित खानापूर, रामनगर, अळणावर, हल्याळ आणि परिसरातल्या सीमाभागातील पुणेस्थित उद्योजकांचा मार्गदर्शन मेळावा सुवासिनी मंगल कार्यालय धायरी, पुणे या ठिकाणी पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून खडकवासला येथील आमदार भीमराव तापकीर, विश्वास ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब पोकळे, बीपीएल फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे, केपीएल फाऊंडेशचे अध्यक्ष रामू गुंडप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विजय पाटील अध्यक्षस्थानी होते.
सचिव शिवाजी जळगेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. मंडळाच्यावतीने भीमराव तापकीर यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुभम शेळके आणि धनंजय पाटील यांच्याशी समन्वय साधून आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक मार्गदर्शक भालचंद्र पुराणिक आणि केशव जावळीकर यांनी उपस्थितांना उद्योगाशी निगडित असणाऱ्या मुद्द्यांवर आणि उद्भवणाऱ्या समस्यांवर बहूमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोझा यांचा तर नूतन अध्यक्ष विजय पाटील आणि उपाध्यक्ष सुरेश हालगी यांचा सन्मान करण्यात आला. दत्ताराम भेकणे, अतुल काकतकर, प्रशांत गुंजीकर, ज्ञानेश्वर गावडे, शिवाजी जळगेकर आदींनी मनोगत मांडताना पीटर डिसोझा यांच्या मंडळाच्या माध्यमातून गेली 7 वर्षे केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला तर नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
पीटर डिसोझा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी जरी अध्यक्षपदावरून बाजूला झालो असलो तरी मंडळाचा एक संचालक म्हणून प्रत्येक उपक्रमांमध्ये पहिल्याइतकाच सदैव कार्यरत राहीन. तर विजय पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आम्ही डिसोझा सरांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. या उपक्रमात मंडळाचे सभासद असलेल्या साधारणपणे 250 उद्योजकांनी सहभाग नोंदविला होता. सूत्रसंचालन परशराम निलजकर आणि युवराज पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन देमानी मष्णूचे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, परशुराम चौगुले, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, नारायण गावडे, पांडुरंग पाटील, राजाराम शिंदे आदांनी परिश्रम घेतले.









