खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या व मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खासदार इराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयुसी) खानापूर घटकातर्फे नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन समस्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रुक्मिणी हलगेकर, मेघा मिठारी, अनिता पाटील, भारती पै, सुमित नाईक, प्रदीप हलगेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खासदार इराण्णा कडाडी यांनी खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका व साहाय्यिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडविण्याबाबत विनंती केली.
तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्या मराठी भाषिक आहेत. त्यांच्यावर कन्नड भाषेची सक्ती करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तसेच अंगणवाड्यांना रेशनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने पालकाकडून मोठ्या प्रमाणात तक्रार होत आहे. टीएचआर प्रक्रियेदरम्यान पालक ओटीपी देत नाहीत, त्यामुळे डेटा अपलोड होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम रेशन पुरवठ्यावर होतो. अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने शासनाकडे आवश्यक आकडेवारी तसेच माहिती पाठवताना अडचणी निर्माण होत आहेत.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
अडचणी सोडविण्यासाठी ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कमी संख्या असलेल्या अंगणवाड्यांचे एकत्रिकीकरण करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकाना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवून देण्यात यावा, कर्नाटक सरकारने 2023 पासून ही योजना सुरू केली असली तरी 2011-12 पूर्वीच्या सेविकाना लाभ मिळावा. अंगणवाडी सेविकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांइतका भत्ता मिळावा. खासगी शाळांमुळे अंगणवाडीतील मुलांची संख्या कमी होत आहे. यासाठी शासनाने अंगणवाडीबाबत योग्य क्रम घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाचा स्वीकार करून आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.









