मोबाईल कंपनीकडून केबल करीता खुदाईः जि.प.बांधकाम विभागाची कारवाईः कारवाईकडे जनतेचे लक्ष
म्हासुर्ली
जिल्हा परिषदेच्या पुंगाव – कुरणेवाडी ते खामकरवाडी इतर जिल्हा मार्ग ५३ वरील खामकरवाडी (ता.राधानगरी) येथील धोकादायक वळण रस्त्यावर एका खासगी मोबाईल कंपनीकडून नेटवर्क केबलकरीता विनापरवाना रस्ता खुदाई केली जात होती. परिणामी माती रस्त्यावर टाकल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. याची दखल राधानगरी पंचायत समिती बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी घेत विनापरवाना केबल खुदाईचे काम रोखले. तरी बांधकाम विभाग संबंधित कंपनी ठेकेदारावर कोणती कारवाई करणार, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या काही दिवसापासून एका प्रतिष्ठीत खासगी मोबाईल कंपनीकडून कळे मार्गे धामणी खोऱ्यातील गवशी – म्हासुर्ली ते तुळशी खोऱ्यातील खामकरवाडी – कुरणेवाडी बुरंबाळी दरम्यानच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मालकीच्या रस्त्यालगत सध्या मोबाईल नेटवर्क केबल खुदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यांच्या बाजू पट्ट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर धुरळ्याची साम्राज्य निर्माण झाले आहे.
संबंधित खाजगी मोबाईल कंपनीने नेटवर्क केबल टाकण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेऊन रीतसर खुदाई सुरू केली आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील गवशी – भित्तमवाडी व खामकरवाडी – कुरणेवाडी ते पुंगाव या रस्त्यावरील केबल खुदाईसाठी संबंधित मोबाईल कंपनीने कोणत्याही प्रकारच परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे राधानगरी पंचायत समिती बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना जिल्हा परिषदेकडून रीतसर परवानगी घेण्याची सूचना केली होती.
मात्र संबंधित ठेकेदारांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता व अधिकाऱ्यांच्या सूचनेला न जुमानता खामकरवाडी – कुरणेवाडी दरम्यानच्या धोकादायक वळण रस्त्यावर सोमवारी विनापरवाना खुदाई करून केबल टाकण्याचे काम सुरु केले होते. परिणामी खामकरवाडी – कुरणेवाडी – पुगांव रस्त्यावर माती टाकल्याने सदर रस्त्यावरून चार चाकीसह इतर मोठ्या वाहनाना प्रवास करताना अडचणीला सामोरे जावे लागत होते. तसेच टाकलेल्या मातीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही बॅरिकेट किंवा रिफ्लेक्टर लावले नसल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले होते.
सदर रस्त्यावर विनापरवाना खुदाई केल्याचे समजतात. राधानगरी पंचायत समिती बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी तत्काळ दखल घेत मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन सदर खुदाई चे काम बंद पडले आहे. व सदर खुदाई काम मुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग विनापरवाना खुदाई करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणती कारवाई करणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
विनापरवाना काम रोखले..!
गेल्या काही दिवसापासून एका खासगी मोबाईल कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावरील केबल खुदाईकरीता लागणारी परवानगी सदर कंपनीने घेतलेली नसल्याने सदरचे काम बंद पाडले आहे.
– विनायक खोत, सहायक अभियंता पंचायत समिती, बांधकाम विभाग राधानगरी








