वृत्तसंस्था /ओटावा
खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण गाजत असतानाच कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानवादी गुंडाची हत्या झाली आहे. त्याचे नाव सुखदुलसिंग दुनेके असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन टोळ्यांमधील संघर्षातून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. त्याच्या हत्येची जबाबदारी भारतातील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारल्याने एकंदर प्रकरणाला वेगळा रंक प्राप्त होण्याची शक्यता आहे.
त्याचे निवासस्थान पंजाबमधील मोगा जिल्ह्यात आहे. तो बनावट पासपोर्ट आणि व्हिसावर कॅनडात गेला असल्याचे स्पष्ट झाले. तो पंजाबमध्ये ‘मोस्ट वाँटेड’ सूचीत समाविष्ट होता. त्याची गुरुवारी कॅनडातील विनीपेग शहरात हत्या करण्यात आली. त्याच्यावर खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि लूटमार असे 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो डिसेंबर 2017 मध्ये कॅनडामध्ये बेकायदेशीर मार्गाने गेला. तेव्हापासून तो तेथेच वास्तव्यास आहे. एका गुन्हेगारी टोळीचा तो हस्तक होता. तसेच, तो खलिस्तानचाही समर्थक होता अशी माहिती देण्यात आली आहे. भारतालाही तो अनेक प्रकरणांमध्ये हवा होता. एनआयएकडून त्याचा शोध घेतला जात होता. तो अंमली पदार्थांची तस्करी आणि व्यापार यांच्याशीही संबंधित असल्याचा आरोप आहे. पंजाबमध्ये दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्यात त्याला हात असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.









