लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून गाडीला घेराव : तिरंग्याचाही अवमान
वृत्तसंस्था/लंडन
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये खलिस्तानींनी भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर मोठ्या संख्येने जमलेल्या खलिस्तानींनी तिरंग्याचाही अवमान केला. भारतीय परराष्ट्रमंत्री लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली आहे. लंडनमध्ये घडलेल्या या घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खलिस्तानवाद्यांनी वाहनाला घेराव घातल्यामुळे भारताने ब्रिटनकडे जोरदार निषेध नोंदविल्यानंतर ब्रिटननेही या घटनेची निंदा केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आल्याची माहिती नाही. ‘इनसाईट यूके’ या सामुदायिक संघटनेने या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर शेअर केले आहे.
जयशंकर ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या वास्तव्याच्या हॉटेलबाहेर धुडगूस घातला. काहीकाळ त्यांनी जयशंकर यांच्या कारलाही घेराव घातला. तथापि, नंतर पोलिसांनी सुरक्षा दिल्याने खलिस्तानवाद्यांनी तेथून काढता पाय घेतला. भारताने या प्रकारावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही एक चिथावणीखोर कृती होती आणि फुटीरतावादी लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर करत होते, असे भारताने म्हटले आहे. आम्ही या प्रकारामुळे नाराज आहोत. हा सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार आहे, असा आक्षेप भारताने ब्रिटनकडे नोंदविला आहे.
ब्रिटनकडूनही निषेध
जयशंकर यांच्या विरोधात धुडगूस घालणाऱ्या खलिस्तानवाद्यांचा निषेध नंतर ब्रिटनचे नेते केर स्टार्मर यांनीही केला आहे. हा प्रकार निंदाजनक होता. आम्हाला याचा खेद आहे. जयशंकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी नव्हती. तरीही असा प्रकार घडल्याचे आम्हालाही वाईट वाटते, असे स्टार्मर यांनी वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान
खलिस्तानवाद्यांपैकी एकाने जयशंकर यांच्या कारवरील भारताचा राष्ट्रध्वज खेचल्याची गंभीर घटना घडली. नंतर या खलिस्तानवाद्याने हा ध्वज फाडला. ही घटना ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर घडली. तथापि, त्यांनी ती रोखण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. जयशंकर यांच्या वास्तव्याच्या हॉटेलबाहेर अनेक खलिस्तानवादी एकत्र आले होते. त्यांनी खलिस्तानचे ध्वज हाती धरले होते आणि ते भारतविरोधी घोषणा देत होते. तरीही तेथे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. भारताने या घटनेचा तीव्र निषेध केला असून ब्रिटनकडे रितसर आक्षेप नोंदविला असून धुडगूस घालणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सुरक्षेतील त्रुटीचा भारताकडून निषेध
ब्रिटन हे बऱ्याच काळापासून भारतातून पळून गेलेल्यांसाठी आणि दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. त्यांनी भारताला ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार करण्याविरुद्ध इशाराही दिला आहे. ब्रिटनला बऱ्याच काळापासून भारतासोबत मुक्त व्यापार करार हवा होता, परंतु आतापर्यंत त्यांची निराशा झाली आहे. खलिस्तानींच्या या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील सुरक्षा परिस्थिती उघडकीस आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षेतील त्रुटीचा निषेध केला करत ब्रिटिश सरकारला त्यांच्या राजनैतिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.









