खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्येची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ टोरंटो
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर सुमारे 60 तासांपासून खलिस्तानी दहशतवादाचा चेहरा ठरलेला गुरपतवंत सिंह पन्नू भूमिगत झाला आहे. मागील 4 महिन्यांमध्ये 5 मोठ्या खलिस्तानी दहशतवाद्यांची विदेशात हत्या किंवा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यामुळे पन्नूला आता स्वत:च्या जीवाची चिंता सतावू लागली आहे. कधीकाळी सोशल मीडियावर भारताविरोधात गरळ ओकणारा पन्नू आता लपून बसला आहे.
पन्नू आता एकाकी पडला आहे. सद्यकाळात भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या विरोधात कारवाईचा विळखा आवळण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे भारतात पन्नूच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे विदेशातही खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करण्यात येत आहे. लंडनमध्ये भारतीय दूतावासासमोर हिंसक निदर्शने करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी एनआयएचे पथक सध्या ब्रिटनमध्ये आहे. या हिंसक निदर्शनांमध्ये मुख्य भूमिका बजावलेला खलिस्तानी दहशतवादी खांडाचा लंडनमध्ये अलिकडेच संशयास्पद मृत्यू झाला आहे.
स्वत:चे सहकारी मारले गेल्याने पन्नू भयभीत झाला आहे. तो सध्या भूमिगत झाला असून आयएसआयच्या पुढील निर्देशाची प्रतीक्षा आता त्याचे हस्तक करत आहेत. 4 महिन्यांमध्ये मृत्युमुखी पडलेले 5 दहशतवादी हे पन्नूच्या शिख फॉर जस्टिस या भारतविरोधी संघटनेशी संबंधित होते. खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख निज्जरची अलिकडेच कॅनडात हत्या झाली आहे.
2020-21 आणि 2022 मध्ये शिख फॉर जस्टिसच्या नावाआड पन्नू हा भारतविरोधी दुष्प्रचाराला विदेशात बळ देत होता. परंतु अलिकडच्या काही महिन्यांमध्ये तो कमजोर झाला असल्याचे मानले जात आहे.