बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार : खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता हरदीप निज्जर
► वृत्तसंस्था/ ओटावा
भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निज्जर हा दहशतवादी संघटना खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) प्रमुख होता. कॅनडात राहून पंजाबमध्ये खलिस्तानी कारवाया घडवून आणण्याच्या कटात तो सामील होता.
प्रारंभिक माहितीनुसार निज्जरवर कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियातील सरी येथील गुरुद्वारानजीक अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. निज्जर या गुरुद्वाराचा प्रमुख देखील होता. दहशतवादी निज्जर गुरुद्वाराबाहेर पार्पिंगमधील स्वत:च्या कारमध्ये असताना 2 युवक दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. निज्जरला कारमधून बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी 2 पंजाबी आणि एका चिनी युवकाला ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु याची पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
निज्जर हा शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंन सिंह पन्नूचा निकटवर्तीय होता. एनआयएने अलिकडेच 40 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती, यात निज्जरचे नाव देखील सामील होते. ब्र्रॅम्पटन शहरात खलिस्तानच्या समर्थनार्थ कथित जनमत चाचणी करविण्यात त्याची भूमिका होती. एनआयएने त्याच्या विरोधात दहशतवादी कट रचण्याचा आरोप ठेवत त्याला फरार घोषित केले होते.

कॅनडातून कारवाया
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जर कॅनडातून संघटनेच्या कारवाया घडवून आणत होता. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भार सिंह पुरा येथील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. याच गावात निज्जरने एका पुजाऱ्याची हत्या घडवून आणली होती. हत्येच्या माध्यमातून पंजाबमध्ये धार्मिक उन्माद फैलावण्याचा त्याचा कट होता. एनआयएने निज्जरवर 10 लाख रुपयांचे इनाम घोषित केले होते. पंजाबमधील पोलीस गुप्तचर मुख्यालय तसेच अनेक पोलीस स्थानकांवर ग्रेनेड हल्ला करविणारा अर्शदीप डल्ला हा निज्जरचाच सहकारी आहे.
एनआयएची कारवाई
निज्जरची संघटना खलिस्तान टायगर फोर्सला मदत करणाऱ्यांवर एनआयएने काही दिवसांपूर्वी पंजाब अन् हरियाणा येथे छापे टाकले होते. केटीएफसाठी निधी जमविण्यासह सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs, दारूगोळा तसेच स्फोटकांच्या तस्करीत सामील असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. पंजाब अन् हरियाणामध्ये मोठे हल्ले घडवून आणण्याची तयारी असल्याचा इनपूट एनआयएला मिळाला होता. या कटाकरता अनेक स्थानिक लोक निधी पुरवत असल्याचे तपासात आढळून आले होते.
#social
निज्जरच्या संघटनेला 4 महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 महिन्यांपूर्वी निज्जरची संघटना केटीएफला दहशतवादी संघटना घोषित केले होते. खलिस्तान टायगर फोर्स ही कट्टरवादी संघटना असून याचा उद्देश पंजाबमध्ये दहशतवाद फैलावणे आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंगमागे या संघटनेचा हात आहे. ही संघटना भारताची एकात्मता, सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते.









