ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये निज्जरचे नाव पुढे आलं होतं, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं होतं.
हरदीप सिंह निज्जर याच्यावर कॅनडातील सरे या ठिकाणी गुरूद्वाराबाहेर गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो कॅनडातील शिख फॉर जस्टिस या शीख संघटनेशी संबंधित होता. तो मूळचा पंजाबमधील जालंधर जिह्यातील रहिवासी होता. तो मागील अनेक वर्षांपासून कॅनडात राहत होता आणि तिथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता.
निज्जर हा भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता. कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती. 2022 मध्ये पंजाबमधील जालंधर इथे एका हिंदू पुजाऱयाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप निज्जरवर आहे. या हत्याकांडानंतर त्याच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. खलिस्तान टायगर फोर्सने हे हत्याकांड घडवून आणलं होतं. हरदीप सिंह निज्जर हा या संस्थेचा प्रमुख होता. निज्जरच्या दोन साथीदारांना काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्स आणि मलेशियामधून अटक करण्यात आली होती. दरम्यान, निज्जरची हत्या झाली असली तरी देखील ही हत्या कोणी केली, यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. कॅनडा पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.