बड्या दहशतवाद्यांवरील कारवाईने भीतीच्या छायेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू दोन दिवसांपूर्वीपासून भूमिगत झाल्याचे वृत्त आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर पन्नू धास्तावला आहे. गेल्या चार महिन्यात परदेशात पाच बड्या खलिस्तानी दहशतवाद्यांची हत्या किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर खोटा प्रचार करण्यात माहीर असलेल्या पन्नूला त्याच्या मृत्यूची भीती वाटत आहे. एकेकाळी खलिस्तानला पाठिंबा देण्याच्या नावाखाली सोशल मीडियावर भारतविरोधी अजेंड्याला हवा देणाऱ्या निज्जरच्या हत्येने आता पन्नूही सावध झाला आहे. भारतातही खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई होत असल्याने अनेक नेते भयभीत झाले आहेत. एकीकडे भारतात आपल्या गुंडांवर कारवाई होत असतानाच त्यांच्या साथीदारांना अटक केली जात आहे, तर दुसरीकडे परदेशातही खलिस्तानी समर्थकांवर कडक कारवाई केली जात असल्यामुळे दहशतवादी पन्नूही घाबरला आहे. किसान आंदोलनात तोडफोड करण्यासाठी लोकांना भडकावल्यानंतर बऱ्याचवेळा केंद्र सरकारच्या विरोधात ऑडिओ-व्हिडिओ टेप पाठवण्यात त्याचा हात होता. तसेच एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यादीत त्याचा समावेश असून लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या हिंसक निदर्शने प्रकरणी एनआयएचे पथक ब्रिटनमध्ये असून त्याच्या थेट भूमिकेचा तपास सुरू आहे.









