शीख ऑफ अमेरिकेच्या संस्थापकाने खलिस्तान समर्थकांना सुनावले
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
शीख ऑफ अमेरिकेचे संस्थापक आणि अध्यक्ष जसदीप सिंह जेसी यांनी खलिस्तान समर्थकांना चांगलेच सुनावले आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे सर्वात कमकुवत पंतप्रधान होते. ट्रुडो यांच्या कार्यकाळातच खलिस्तानी समर्थन वाढले. हे समर्थन नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वात कमी होईल असे उद्गार जेसी यांनी काढले आहेत. खलिस्तानी समर्थन आणि खलिस्तानी प्रभाव जो आम्ही यापूर्वी पाहिला होता, तो आता कमी होणार आहे. जस्टिन ट्रुडो हे स्वत:च्या पित्याप्रमाणेच अत्यंत कमकुवत पंतप्रधान होते आणि त्यांच्याकडे भारताच्या विरोधात एक अजेंडा होता, जो आता संपुष्टात आला आहे. कॅनडात आता खलिस्तानी प्रभाव नाही. खलिस्तानी समर्थकांचे प्रमाण खूपच कमी आहे. भारताबाहेर राहणारे बहुतांश शीख भारत, पंजाबवर प्रेम करणारे आहेत आणि भारत आणि पंजाबचा विकास व्हावा अशीच त्यांची इच्छा आहे. मी खलिस्तानींना शीख मानत नाही, कारण ते शीख धर्माच्या मूल्यांचे पालन करत नाहीत असे जेसी यांनी म्हटले आहे.
जी-7 शिखर परिषदेसाठी कॅनडाकडून पंतप्रधान मोदींना देण्यात आलेले निमंत्रण स्वागतार्ह आहे आणि भारत-कॅनडा संबंधांसाठी ही सकारात्मक बाब आहे. भारत एक अत्यंत मजबूत राष्ट्र आहे. ही एका चांगल्या संबंधांची सुरुवात असल्याचे उद्गार जेसी यांनी काढले आहेत.
खलिस्तानच्या नावावर अवैध व्यापार
खलिस्तानी आंदोलनाच्या नावावर समाजकंटक सर्वप्रकारचा अवैध व्यापार करत आहेत. या खलिस्तान समर्थकांना आम्ही मानवतस्करीत सामील असल्याचे पाहिले आहे. जे युवा डंकी मार्गाने विदेशात येतात, त्यांना गुरपतवंत सिंह पन्नूसारखे कथित खलिस्तानी नेत्यांकडून चुकीच्या मार्गात लोटले जात आहे. जनमत चाचणीच्या नावाखाली या युवांना खोटी आश्वासने देण्यात येतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर हा प्रकार थांबला आहे. तर अवैध स्थलांतराच्या प्रकरणांचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजास्थळांवर हल्ले चुकीचे
आम्ही सर्वप्रकारच्या हिंसेची निंदा करताहे. शांततापूर्ण निदर्शनात काहीच चुकीचे नाही. परंतु हिंदू मंदिर-पूजास्थळांवर हल्ले करणे चुकीचे आहे. पूजास्थळावर हल्ला करणे शिख मूल्यांच्या विरोधात आहे. शीख नेहमीच भारतातच राहिले असून हिंदू आमचे बांधव आहेत आणि आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. भारतीय समुदायाला एकजूट रहावे लागेल असे जेसी यांनी म्हटले आहे.









