भारतविरोधी प्रस्ताव फेटाळला
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या संसदेत भारतविरोधी प्रस्ताव मांडण्यात आला होता, जो एका भारतीय-कॅनेडियन खासदाराच्या विरोधानंतर फेटाळला गेला आहे. कॅनडाच्या संसदेत 1984 च्या शिखविरोधी दंगलीला नरसंहार घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, या प्रस्तावाला खासदार चंद्र आर्य यांनी विरोध दर्शविला होता. या प्रस्तावाला विरोध केल्याप्रकरणी मला धमक्या देखील मिळाल्या आहेत. संसदेत सादर झालेला हा प्रस्ताव राजकीय स्वरुपात शक्तिशाली खलिस्तान समर्थकांच्या लॉबीकडून प्रस्तावित होता. खलिस्तान समर्थकांच्या लॉबीकडून पुन्हा अशाप्रकारचा प्रस्ताव संमत करविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याचमुळे कॅनडातील हिंदू नागरिकांनी स्वत:च्या स्थानिक खासदारांशी संपर्क साधावा आणि भविष्यात अशाप्रकारच्या प्रस्तावांना विरोध करण्याची मागणी करावी असे चंद्र आर्य यांनी आवाहन केले आहे.
हा भारतविरोधी प्रस्ताव न्यू डेमोक्रेटिक पार्टीचे खासदार सुख धालीवाल यांनी विदेश आणि आंतरराष्ट्रीय विकास विषयक कॅनडाच्या संसदेच्या स्थायी समितीसमोर मांडला होता. कॅनडाच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये केवळ चंद्र आर्य यांनी या प्रस्तावाला विरोध केला आणि तो संमत होण्यापासून रोखला आहे. सरे-न्यूटनच्या खासदाराने 1984 च्या शिखविरोधी दंगलींना नरसंहार घोषित करण्याचा प्रयत्न केला. या खासदाराने प्रस्ताव संमत करण्यासाठी हाउस ऑफ कॉमन्सच्या सर्व खासदारांकडून सहमती मागितली होती. या प्रस्तावाला विरोध करणारा मी एकमेव खासदार होतो. संसद भवनात या प्रस्तावाला विरोध केल्यावर त्वरित मला धमकाविण्यात आले असे आर्य यांनी सांगितले आहे.









