उत्तर प्रदेशातील चकमकीनंतर परिस्थिती स्पष्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’ या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशात ठार करण्यात आल्यानंतर आता या संघटनेची मुळे पाकिस्तानात असल्याची बाब समोर आली आहे. या शीख दहशतवादी संघटनेची स्थापना 1993 मध्ये झाली होती. या संघटनेचा संस्थापक रणजीतसिंग ऊर्फ नीता हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील असून सध्या तो पाकिस्तानात लपला आहे. तेथून तो भारताचे सार्वभौमत्व तोडण्याचे प्रयत्न करत असून भारतातील पंजाब राज्याला स्वतंत्र खलिस्तान देश बनविण्याचा त्याचा प्रयत्न आहे, ही बाब स्पष्ट झाली आहे.
रणजीतसिंग याने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहेत. हे संबंध 1980 च्या दशकात, जेव्हा पंजाबमध्ये दहशतवाद त्याच्या चरमसीमेवर होता, तेव्हा सर्वाधिक जवळचे होते. जम्मू प्रदेशातील शीखबहुल भागातून अधिकाधिक शीख तरुणांना आपल्या संघटनेते ओढण्याचे काम त्याने केले आहे. या सर्व तरुणांच्या मनात भारताविरोधाचे वीष कालवून तो त्यांच्या हातून पंजाबमध्ये हिंसाचारी कृत्ये करवून घेत असे. त्याला पाकिस्तानकडून धन, शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळत असे. आताही हीच परिस्थिती आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस संचालक एस. पी. वैद यांनी दिली आहे.
धार्मिक नेत्यांच्या हत्या
2009 पासून या संघटनेने पंजाब आणि इतरत्र धार्मिक नेत्यांच्या हत्यांचे सत्र चालविले होते. 2009 मध्ये पंजाबमधील राष्ट्रीय शीख संगत या संस्थेचे प्रमुख रुद्र सिंग यांची हत्या करण्यात आली. जुलै 2009 मध्ये व्हिएन्ना येथे डेरा सचखंडचे प्रमुख संत रामानंद यांची हत्या करण्यात आली. 2017-2018 पासून रणजीतसिंग याच्या कारवाया कमी झाल्या असल्या तरी तो आजही या संघटनेचे नेतृत्व करत असून संधी मिळताच डोके वर काढण्याची शक्यता आहे. सोमवारी खलिस्तान झिंदाबाद फोर्सचे तीन दहशतवादी उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथे मारले गेल्यामुळे या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून या संघटनेत भरती होणाऱ्या युवकांची संख्याही बरीच कमी झाली आहे, असेही प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस संचालक वैद यांनी केले आहे.
दहशतवादी संघटना म्हणून घोषित
खलिस्तान झिंदाबाद फोर्स ही संघटना भारताच्या बेकायदा कृत्यविरोध कायद्याच्या अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित झाली आहे. या संघटनेच्या शाखा पाकिस्तान, ब्रिटन, स्विट्झर्लंड, इटली, जर्मनी, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया, बेल्जियम, नेपाळ आणि मलेशिया या देशांमध्ये आहेत. भारतासह या सर्व देशांमध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन महासंघाचे सदस्य असणाऱ्या देशांमध्येही ही संघटना आणि तिच्या शाखा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
रणजीतसिंग हा घोषित दहशतवादी
रणजीतसिंग याला व्यक्तीश: दहशतवादी म्हणून, 2020 मध्ये युएपीए कायद्याच्या अंतर्गत घोषित करण्यात आले आहे. तो भारतात दहशतवाद भडकविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतात शस्त्रे आणि अंमली पदार्थ यांची तस्करी करण्यात तो आघाडीवर आहे. 2000 मध्ये त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती. ही नोटीस आजही लागू आहे.
अनेक हत्या, हल्ल्यांमध्ये सहभाग
1997 ते 2005 या काळात ही संघटना भारतातील अनेक हत्या आणि हल्ल्यांमध्ये सहभागी होती. 1997 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथे दोन बसेसमध्ये बाँबस्फोट घडविण्यात आले होते. या हल्ल्यात अनेक प्रवासी ठार झाले होते. 1998 मध्ये शालीमार एक्स्प्रेसमध्ये या संघटनेने बाँबस्फोट घडविला होता. रणजीतसिंग याला भारतात पाठविण्याची मागणी भारताने पाकिस्ताकडे केली आहे.









