वृत्तसंस्था/ कोलकाता
इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या जमशेदपूर एफसी फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी खलिद जमिलची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या संघाचे प्रशिक्षक स्कॉट कुपर हे कार्यरत होते. अलिकडेच भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यात जमशेदपूर एफसी संघाला ओडीशा एससीकडून हार पत्करावी लागल्याने या संघाच्या फ्राँचायजीने कुपर यांच्या जागी खलिद जमिलची निवड करण्याचा निर्णय घेतला.
आता इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामातील उर्वरित सामन्यात जमशेदपूर एफसी संघाला खलिद जमिल हे प्रशिक्षक म्हणून राहतील. 2016-17 साली झालेल्या आय लिग फुटबॉल स्पर्धेत एफसी एwझवाल संघाला जेतेपद मिळवून दिल्यानंतर खलिद जमिल यांचे नाव भारतीय फुटबॉल क्षेत्रात चमकले. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत खलिद जमिल यांनी इस्ट बंगाल आणि मोहन बागान या बलाढ्या संघांनाही मार्गदर्शन केले होते. 10 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये जमशेदपूर एफसी आणि नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी यांच्यात सामना होणार असून खलिद जमिल यांचे जमशेदपूर एफसी संघातील फुटबॉलपटूंना बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.









