वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2017 मध्ये ऐजवाल फुटबॉल क्लबला आय लीगचे जेतेपद मिळवून देण्यासाठी संघाला मार्गदर्शन केलेल्या खलिद जमिल यांची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती झालेले ते गेल्या 13 वर्षांतील पहिले भारतीय आहेत.
48 वर्षीय जमिल हे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असून सध्या ते जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक आहेत. शुक्रवारी एआयएफएफ कार्यकारी समितीची बैठक झाली, त्यात त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. या पदासाठी संघाचे दोन माजी प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन व स्टीफन तार्कोविच हेही शर्यतीत होते. तार्कोविच यांनी याआधी स्लोव्हाकियाचे प्रशिक्षक म्हणून पाहिलेले आहे.
आयएम विजयन यांच्या अध्यक्षतेखालील एआयएफएफच्या तांत्रिक समितीने तीन सदस्यांची यादी कार्यकारी समितीकडे अंतिम निर्णयासाठी पाठविली होती. मानोलो मार्क्वेझ यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील. भारतीय संघाची अलीकडे झालेल्या निष्प्रभ प्रदर्शनानंतर मार्क्वेझ यांनी पद सोडले होते. राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले साविओ मेदीरा हे शेवटची भारतीय होते. 2011 ते 2012 या कालावधीत त्यांनी हे पद सांभाळले होते. 29 ऑगस्टपासून ताजिकिस्तान येथे होणाऱ्या सीएएफए नेशन्स चषक स्पर्धेत ते संघाची जबाबदारी सांभाळतील.









