वृत्तसंस्था/ लंडन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या क्वीन्स क्लब ग्रासकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या तातआना मारियाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा पराभव केला.
दोन अपत्य असलेली 37 वर्षीय मारियाने उपांत्य सामन्यात मॅडिसन कीजचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव केला. मारियाचा कीजवरील हा पहिला विजय आहे. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी 2020 नंतरची मारिया ही सर्वात अधिक वयाची टेनिसपटू ठरली आहे. 2020 साली अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने आपल्या वयाच्या 38 व्या वर्षी ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धा जिंकली होती. कीजने या उपांत्य सामन्यात 10 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित अमंदा अॅनिसिमोव्हाने चीनच्या क्वीनवेनचा 6-2, 4-6, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मारिया आणि अॅनिसिमोव्हा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









