वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई येथे झालेल्या क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्समध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय ग्रँडमास्टर एम. प्रणेशने चॅलेंजर्स विभागाचा मुकुट जिंकला, तर विन्सेंट कीमरने रे रॉबिन्सनवर विजय मिळवून मास्टर्स विभागात आधीच निश्चित केलेले विजेतेपद पटकावले.
कीमरच्या जेतेपदामुळे त्याला 25 लाख रुपये (अंदाजे 28,500 अमेरिकन डॉलर्स) मिळाले. त्याशिवाय त्याने जगातील आघाडीच्या दहा खेळाडूंत झेप घेतली आहे आणि 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेकरिता पात्र ठरण्याच्या दृष्टीने 24 फिडे सर्किट पॉइंट्स कमावले आहेत. खरे तर जर्मन ग्रँडमास्टरने (7 गुण) गुरुवारीच आपल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते, त्यामुळे सर्वांचे लक्ष चॅलेंजर्स विभागावर होते.
चॅलेंजर्स विभागात नाट्यामय चढउतार झाले, कारण पा इनियानने अभिमन्यू पुराणिकला पराभूत केले, तर अधिबान भास्करनने लिओन ल्यूक मेंडोन्साला पराभूत केले. त्यामुळे पा इनियान आणि अधिबान भास्करन यांना दुसऱ्या स्थानावर लिओन आणि अभिमन्यूशी बरोबरी करता आली. दिप्तयन घोष आणि आर्यन चोप्रा यांनीही अनुक्रमे वैशाली रमेशबाबू आणि द्रोणवल्ली हरिका यांना पराभूत करून उच्च स्थान मिळवले. परंतु प्रणेशने (6.5 गुण) गुरुवारी 0.5 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली होती, जी इतर स्पर्धकांनी जोरदार धडपड केली असली, तरी त्याच्यासाठी उपयुक्त ठरली.
तथापि, अंतिम फेरीत प्रणेश इंटरनॅशनल मास्टर जी. बी. हर्षवर्धन याच्याकडून पराभूत झाला. प्रणेशच्या खात्यात या जेतेपदानिशी 7 लाख रुपयांची भर पडली असून पुढच्या वर्षी त्याला मास्टर्स श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे. मास्टर्स विभागात अर्जुन एरिगेसीने ग्रँडमास्टर कार्तिकेयन मुरली आणि अनीश गिरी यांच्यासोबत दुसरे स्थान मिळवले. एरिगेसी आणि कार्तिकेयन यांच्यातील सामना बरोबरीत संपला, तर अवांडर लियांगला विदित गुजरातीने राखला. निहाल सरिनने प्रणव व्ही. ला नमवत मध्य स्थानावर झेप घेतली. दिवसाचा निर्णायक विजय तिसऱ्या पटावर नोंदविला जाऊन तिथे गिरीने जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना पराभूत केले आणि एरिगेसी व कार्तिकेयनसोबत तो दुसऱ्या स्थानावर आला.









