ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Ketaki Chitale sent to 14 days judicial custody)
केतकीची पोलीस कोठडी आज संपत असल्याने तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. ठाणे गुन्हे शाखेने केतकीवर आयटी ऍक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांनी केतकीची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केतकी विरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकीचा ताबा मिळावा, यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला आहे.
आधीच्या सुनावणीवेळी केतकीने वकील घेतला नव्हता. तिने स्वत:च तिची बाजू मांडली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीवेळी ऍड. घनश्याम उपाध्याय यांनी केतकीची बाजू मांडली. त्यांनी केतकीच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीवर राज्यभरात तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे एका गुन्ह्यात जामीन मिळाला की लगेच दुसऱ्या शहरातील पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.








