अग्नी लेखापरीक्षणाचा दाखला देत महापालिकेच्या यंत्रणेने नेहमीप्रमाणे हात झटकले
By : दिपक जाधव
कोल्हापूर : कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत बेचिराख झाले. या घटनेस शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे, पण आग नेमकी कशामुळे लागली, याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंतही कोणत्याही यंत्रणेला पोहोचता आलेले नाही, गेले वर्षभर मनपाचे अधिकारी वेगवेगळ्या नेत्यांच्या, मान्यवरांच्या समित्यांच्या पाहणीत गुंतून राहिले आहेत.
याचवेळी या घटनेमागे घातपात, अर्थपूर्ण व्यवहाराचे धागेदोरे गुंतले आहेत का, यावरून संशयाचे वारे आजपर्यंत नाट्यगृहावर घोंघावत राहिले आहे. नाट्यगृहाच्या आगीसाठी महावितरण यंत्रणा कारणीभूत असल्याचे पहिल्यांदा सांगितले जात होते. अग्नी लेखापरीक्षणाचा दाखला देत महापालिकेच्या यंत्रणेने नेहमीप्रमाणे हात झटकले. पोलिसांचा तपास कुठेपर्यंत आला आहे, याचा थांगपत्ताच नाही.
त्यामुळे आग लागली तरी कशामुळे, असा प्रश्न वर्षानंतरही कायम आहे. आगीच्या संशयाची सुई आजही अनेक जागी फिरत आहे. नाट्यगृहामागील खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. त्यावेळेस येथे असणारा काहींचा वावर चर्चेचे कारण ठरला होता. रात्री उशिरा येथे मद्यपी, गांजा ओढणारे बिनदिक्कत वावरत असतात.
अशाच कोण्या मद्यपीच्या उठाठेवीमुळे नशेत आग लागली का, हा प्रश्न आजही कायम आहे. खासबाग मैदानावर गादी (मॅट) होती. तिला आग लागून ती भडकली. जवळच असणारे लाकडी साहित्य पेटून लागलेल्या आगीत नाट्यगृहाची मोठी हानी झाल्याची चर्चा आजही आहे. आणि हीच शक्यता पडताळण्यात महापालिकेची चौकशी समिती आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने वर्ष घालवले.
नाट्य चळवळीचा मूक साक्षीदार असलेल्या, याच चळवळीचा प्रदीर्घ असा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीसमोर मांडणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून वर्ष उलटले तरी ही आग कशामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही. आगीचा तपास वेगवेगळ्या पातळीवर झाला. पण यातील कोणालाच आगीचा छडा लावता आला नाही.
आगीचे कारण स्पष्ट नसल्याने तपासाची फाईल आता बंद आहे. ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री नऊच्या सुमारास खासबागवरील मंच आणि त्याच्याजवळील नाट्यगृहाला भीषण आग लागली. नाट्यगृहाचा बराचसा लाकडी, छताचा भाग आगीने वेढला रात्री कोणीही नसताना, बंद नाट्यगृहाला आग लागलीच कशी, हा शहरवासीयांना पडलेला प्रश्न होता.
काही उलटसुलट चचदिखील पसरल्या. परंतु नेमके कारण शोधण्यात कोणत्याच तपास यंत्रणेला यश आले नाही. आग लागल्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांनी आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याचा खुलासा केला. नाट्यगृहातील वायरिंग तसेच तेथील विद्युत गृहातील अनेक बॅटरीज, पाईप सुस्थितीत होत्या.
वीज महावितरणनेदेखील आग शॉर्ट सर्किटने लागली नसल्याचा खुलासा केला होता. त्यामुळेच ही आग मानव निर्मित होती का? अशीच चर्चा आजही आहे. फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमने देखील येथे तब्बल २८ नमुने घेतले. अग्निशमनने हात झटकल्याने पोलिसांवरील तपासाची जबाबदारी वाढली होती. फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालाची आशा होती, परंतु तोही अहवाल संभ्रम निर्माण करणारा आल्याने आता आग कशामुळे लागली, हा विषयच संपला आहे.
दहा वर्षांपूर्वी नाट्यगृह आणि खासबाग मैदान सुधारण्यासाठी शासनाने १० कोटी दिले होते. दोन्ही कामांच्या नूतनीकरणाचा खर्च योग्य प्रमाणात झालेला नाही, तो केवळ कागदावरच आहे. मनपा अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण व्यवहारात हात गुंतले आहेत, असा आरोप त्यावेळेस कृती समितीने केला होता.
यासंदर्भात पाहणीसाठी कृती समिती, महापालिका अधिकाऱ्यांची गतवर्षी ऑगस्टमध्येच चर्चा झाली होती. समिती अधिकाऱ्यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी नाट्यगृहात प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही ठरले होते. त्या आधीच दोन दिवस नाट्यगृहाला आग लागली. त्यामुळे नूतनीकरणाचे काम नेमके किती झाले होते, त्यावरचा निधी खरेच खर्ची पडला होता का, हे सारेच प्रश्न नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या राखेत मिसळून गेले. त्यांची उत्तरे आता एक वर्षानंतरही मिळणे कठीण झाले आहे.








