वृत्तसंस्था/बुचारेस्ट (रुमानिया)
येथे झालेल्या सुपरबेट क्लासिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय मानांकित ग्रॅन्डमास्टर फॅबियानो केरुनाने आपले तिन्ही रॅपीड गेम्स जिंकून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविले. भारतातील ग्रॅन्डमास्टर आर. प्रग्यानंद आणि डी. गुकेश यांना टायब्रेकरमध्ये पराभव पत्करावा लागला.
भारताच्या डी गुकेश आणि आर. प्रग्यानंद यांना ही स्पर्धा यशदायी ठरली नाही. क्लासिकल फॉर्मेटमध्ये हॉलंडच्या अनिष गिरीकडून केरुनाला पराभव पत्करावा लागल्याने ही स्पर्धा सर्व स्पर्धकांसाठी खुली ठरली. क्लासिकल विभागात गुकेश, प्रग्यानंद आणि फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा हे संयुक्त पहिल्या स्थानावर राहिले. क्लासिकल विभागातील डावामध्ये अलिरेझाने क्लासिकल फेरीतील शेवटचा डाव जिंकला असता तर टायब्रेकरचा अवलंब करण्याची जरुरी भासली नसती आणि तो गुणामध्ये केरुनाला मागे टाकला असता. पण केरुनाने आपला डाव गमविला. त्यानंतर गुकेश आणि प्रग्यानंद यांच्यातील टायब्रेकरमधील लढत बरोबरीत राहिली. त्यामुळे या स्पर्धेतील विजेता फोर वे टायब्रेकर डावावर घोषित करण्यात आला. टायब्रेकरमध्ये केरुनाने आपले तिन्ही रॅपिड गेम्स जिंकून स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. केरुनाने गुकेश, प्रग्यानंद आणि अलिरेझा यांना पराभूत करत जेतेपदासह 68500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस पटकविले. टायब्रेकरमध्ये भारताच्या दोन स्पर्धकांना बॅकफुटवर यावे लागले.
या स्पर्धेत प्रग्यानंदला आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि अलिरेझाने त्याच्यावर मात करत आघाडी घेतली. या डावात प्रग्यानंद पराभव वाचविण्यासाठी मध्यंतरावेळी चांगलाच झगडत होता. गुकेश आणि वेस्ले सो यांच्यातील डाव 22 चालीनंतर बरोबरीत राहिला.









