आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांचे प्रतिपादन. डिचोलीत ओणम उत्सव उत्साहात. सर्वांनी घेतला केरळी भोजनाचा आस्वाद.
डिचोली : गोव्याला आपली दत्तक भुमी मानणाऱ्या केरवासीयांनी गोव्याशी आपले नाते जुळवून घेतले आहे. सर्व प्रकारच्या लोकांबरोबर गुण्यागोविंदाने राहताना, वावरताना या लोकांनीही गोव्यासाठी आपले योगदान दिले आहे. केरळी लोक मेहनती असल्यानेच आज ते सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आज ते पूर्णपणे गोवेकर बनले आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी केले. कल्पका असोसिएशन या केरळी बांधवांच्या संघटनेतर्फे बोर्डे डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या ओणम उत्सवात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, साखरीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, गोवा मल्याळी असोसिएशनचे अध्यक्ष वासू नायर, डिचोली कल्पका असोसिएशनचे अध्यक्ष पी.वी. जयप्रकाश व इतरांची उपस्थिती होती.
गोवेकर व केरळींचे मनोमिलन
गोव्यात बरीच वर्षे स्थायिक झालेल्या केरळी लोक आज पूर्णपणे गोवेकरच बनले आहेत. गोव्याशी त्यांनी इतके जुळवून घेतले आहे की, आता गोव्यातील मुलींचा विवाह केरळी मुलांबरोबर होत आहे. तर केरळी मुलीही गोवेकरांशी विवाहबध्द होत आहेत. त्यामुळे आता केरळी लोक गोवेकरांचे नातेसंबंधी बनत आहेत, असे आमदार शेट्यो म्हणाले. गोवा हा सर्वात शांतता प्रिय प्रदेश असल्याने येथे बाहेरून येणारा माणूस गोवा सोडायला तयार होत नाही. केरळी लोकांनी गोव्याला आपले केले असून या राज्यात आज त्यांनी बरीच मजल मारली आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशाची अखंडता राखण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यामुळेच भारताची सांस्कृतिक व पारंपरिक ठेव आजही अबाधित राहिली, असे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले. यावेळी डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, वासू नायर यांचीही भाषणे झाली. पोक्कलम या फुलांची रांगोळी घालण्याच्या स्पर्धेत प्रथम विजेत्या मल्याळम मिशन साखळी, दुसरे जॉन्सन ग्रुप मुळगाव व तिसरे सती रवींद्र ग्रुप माशेल यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात अव्वल गुण मिळवत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमानंतर खास केरळी पध्दतीतील भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. तर संध्याकाळी केरळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.









