वृत्तसंस्था / चेन्नई
येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत केरळचा 32 वर्षीय अॅथलिट कार्तिक उन्नीकृष्णनने पुरुषांच्या तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकाविले.
कार्तिक उन्नीकृष्णनने यापूर्वी विश्व अॅथलेटिक्स टूरवरील भुवनेश्वरमध्ये झालेल्या स्पर्धेत या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. चेन्नईतील या स्पर्धेमध्ये पावसाचा वारंवार अडथळा आल्याने काही क्रीडा प्रकार लांबणीवर टाकण्यात आले. पुरुषांच्या तिहेरी उडीत कार्तिकने 16.44 मी.ची नोंद करत सुवर्णपदक तर केरळच्या अब्दुल्ला अबुबाकरने 16.37 मी.ची नोंद करत रौप्य पदक, तर प्रवीण चित्रावेलने 16.35 मी.चे अंतर नोंदवित कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने सुवर्णपदक मिळविताना 13.60 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात तामिळनाडूच्या मानवने रौप्यपदक तर केरळच्या मोहम्मद लेझानने कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत उत्तरप्रदेशच्या अभिषेक पालने सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या हातोडाफेकीत पंजाबच्या दमनीत सिंगने 69.25 मी.चे अंतर नोंदवित सुवर्णपदक घेतले. पश्चिम बंगालच्या मोमिता माँडलने महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले.









