मूळच्या वायनाड येथील उद्योगपतीवर संशय, माहिती संकलित करण्यास प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तीन दिवसांपूर्वी लेबेनॉन ते सीरिया या पट्ट्यात हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेवर करण्यात आलेल्या पेजर हल्ल्याचा संबंध भारतातील केरळ राज्याच्या वायनाडपर्यंत पोहचला आहे. मूळचा वायनाड येथील असणारा आणि आता नॉर्वे या देशाचा नागरीक असणारा रिनसन जोस नामक उद्योगपतीच्या कंपनीने हे पेजर्स पुरविले होते असा आरोप केला जात असून चौकशीला प्रारंभ झाला आहे.
या पेजर स्फोटांमध्ये हिजबुल्लाचे किमान 40 हस्तक ठार झाले असावेत असे अनुमान आहे. तसेच हजारो हस्तक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच भागात शेकडो वॉकीटॉकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही असेच स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 32 जण ठार तर शेकडो जखमी झाले आहेत.
नोर्टा ग्लोबलचा मालक
जोस हा नोर्टा ग्लोबल या कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. ही कंपनी नॉर्वे या देशात कार्यरत आहे. याच कंपनीने लेबेनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांना शेकडो पेजर्सची विक्री केली होती, असा आरोप करण्यात येत आहे. तथापि, या पेजर्समध्ये स्फोटके दडविलेली आहेत, याची माहिती जोस याला होती की नव्हती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या पेजर्सची निर्मिती त्याच्या कंपनीने केली नव्हती. त्याने केवळ विक्री केली होती, अशीही चर्चा आहे.
नातेवाईकांची चौकशी
जोस याचे नातेवाईक केरळमध्ये आहेत. त्यांच्याकडून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या नातेवाईकांची चौकशी झाल्याचे वृत्त असले तरी त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. जोस असे काही करेल याची शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. तथापि, तो नॉर्वेला गेल्यापासून बराच काळपर्यंत त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, असेही त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. जोस याच्या पत्नीशीही नातेवाईकांचा संपर्क झालेला नाही, असे थंकाचन नावाच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे.
स्फोट कोणी घडविले ?
स्फोट झालेल्या पेजर्सची निर्मिती तैवान आणि बुल्गारिया येथील कंपन्यांनी केली होती, असाही आरोप करण्यात येत होता. तथापि, या दोन्ही देशांनी हा आरोप फेटाळला असून या पेजर्सच्या पुरवठा साखळीशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. हे इस्रायलचे कारस्थान आहे, असा इराण आणि हिजबुल्लाचा दावा असून इस्रायलवर सूड उगविला जाईल, अशी धमकी या देशांनी दिली आहे. पेजर्समध्ये केव्हा, कोणी आणि कोठे स्फोटके बसविण्यात आली, याचाही अद्याप शोध लागलेला नसून अद्यापही उत्तरदायित्व स्पष्ट झालेले नाही.
इस्रायलचे मौन
या हल्ल्यासंदर्भात इस्रायलने अद्यापही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तैवान, बुल्गारिया, नॉर्वे आणि रुमानिया या देशांकडे इराणने बोट दाखविले आहे. तथापि, या देशांविरोधात कोणताही पुरावा अद्याप दिसून आलेला नाही. त्यामुळे अद्यापही या स्फोटांचे गूढ उकललेले नसल्याचे दिसून येते. इस्रायलची गुप्तहेर संस्था ‘मोस्साद’वर हे कारस्थान रचल्याचा आरोप आहे. पण तो सिद्ध झालेला नाही.
हिजबुल्लाचा म्होरक्या ठार
पेजर हल्ला झाल्यानंतर त्वरीत हिजबुल्लाच्या स्थानांवर इस्रायलने विमान हल्ले चढविले आहेत. शुक्रवार आणि शनिवार असे सलग दोन दिवस हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाची अग्निबाण डागण्याची यंत्रणा उध्वस्त करण्यात आली. 1 हजाराहून अधिक अग्निबाण प्रक्षेपक नष्ट करण्यात आले आहेत. तसेच हिजबुल्लाचा मोठा शस्त्रसाठा नष्ट करण्यात आला आहे. या हल्ल्यात 50 हून अधिक दहशतवादी ठार झाले असून या संघटनेचे दोन महत्वाचे म्होरकेही ठार झाले आहेत. त्यांची नावे अहमद वहाबी आणि इब्राहिम अकील अशी त्यांची नावे आहेत. हा हिजबुल्लाला मोठाच धक्का मानला जात असून इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे या संघटनेची फार मोठी हानी आहे, असे तज्ञांचे मत आहे.
इस्रायलकडून हिजबुल्लाची मोठी हानी
ड इस्रायलच्या सततच्या हल्ल्यामुळे हिजबुल्लाची व्यापक प्रमाणात हानी
ड पेजर हल्ला कोणी केला, याचा अद्यापही सुगावा नाही, चौकशी सुरु
ड पेजर हल्ल्यामागे मूळचा केरळचा उद्योगपती असल्याचा आहे आरोप
ड हिजबुल्लाचे दोन महत्वाचे म्होरके इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गतप्राण









