सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केले दु:ख
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर मोठी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आणि आमच्या समाजात अद्याप वर्णभेद असल्याचे म्हटले आहे. मुख्य सचिवांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर वर्णभेदावरून चर्चा सुरू झाली असून मोठ्या संख्येत लोक मुख्य सचिवांचे समर्थन करत आहेत.
काळ्या रंगामुळे बालपणापासूनच कमी लेखले जात असल्याची जाणीव मला व्हायची. परंतु माझ्या मुलांनी काळा रंग देखील सुंदर असतो हे समजाविले हेते. अलिकडेच कुणीतरी माझ्या अणि माझ्या पतीच्या मुख्य सचिव म्हणून कार्यकाळाची तुलना केली. या व्यक्तीने माझा कार्यकाळ हा तितकाच काळा आहे, जितका माझ्या पतीचा श्वेतवर्ण असल्याची टिप्पणी केली असा दावा शारदा मुरलीधरन यांनी केला. शारदा यांचे पती डॉ. व्ही. वेणू हे केरळचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. संबंधित व्यक्तीच्या टिप्पणीने दुखावले गेलेल्या शारदा मुरलीधरन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती, जी नंतर हटविण्यात आली. परंतु शारदा यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे.
मागील 7 महिन्यांपासून, जेव्हापासून मी माझ्या पतीच्या जागी मुख्य सचिव पद सांभाळले आहे, तेव्हापासून दोघांच्या कार्यकाळाच्या तुलनेचे सत्र निरंत सुरू आहे, परंतु आता या तुलनेने विकृत रुप धारण केले आहे. ही तुलना काळ्या रंगाचे लेबल लावत करण्यात आली आहे. परंतु काळा रंग ब्रह्मांडाचे सर्वव्यापी सत्य असताना त्याला बदनाम का केले जातेय? काळा रंग कुठल्याही गोष्टीला अवशोषित करू शकतो असे शारदा यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.









