वृत्तसंस्था / भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या 2025 च्या कलिंगा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत केरळ ब्लास्टर्सने इस्ट बंगालचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. केरळ ब्लास्टर्सने हा सामना 2-0 असा एकतर्फी जिंकला.
या सामन्यात केरळ ब्लास्टर्सतर्फे जिजस जिमेनेझ आणि नोव्हा सेदाओई यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात केरळ ब्लास्टर्सने सुरूवातीपासूनच आक्रमक चाली करत इस्ट बंगाल संघावर चांगलेच दडपण आणले. सातव्या मिनिटाला इस्ट बंगालच्या रिचर्ड सेलीसने गोल करण्याची संधी थोडक्यात गमविली. मध्यंतराला 5 मिनिटे बाकी असताना केरळ ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल करण्यात आली आणि जिमेनेजने शानदार गोल केला. 64 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सचा दुसरा गोल नोव्हा सेदाओईने नोंदविला. या स्पर्धेत इस्ट बंगाल हा विद्यमान विजेता आहे. आता या स्पर्धेत केरळ ब्लास्टर्स आणि मोहन बागान यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना शनिवार दि. 26 एप्रिलला खेळविला जाणार आहे.









