वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरु असलेल्या 2025 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये बिट्रेसी चिबेटने सुवर्णपदक पटकाविताना आपल्याच देशाच्या फेथ किपयेगॉनला मागे टाकले.
25 वर्षीय बिट्रेसीने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 5000 आणि 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत अपराजीत राहण्याचा पराक्रम केला आहे. या क्रीडा प्रकारात चिबेटने 14 मिनिटे, 54.36 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. केनियाच्या फेथ किपयेगॉनने 14 मिनिटे, 55.07 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर इटलीच्या नाबिया बॅटोक्लेटीने 14 मिनिटे, 55.42 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती चिबेटने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत केली आहे. इटलीच्या बॅटोक्लेटीचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. बॅटोक्लेटीने महिलांच्या 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते.









