जामीन याचिकेवर 5 जून रोजी निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सदर याचिकेवरील सुनावणीवेळी सर्व पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. याचदरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अरविंद केजरीवाल यांच्या आजच्या कारवायांशी संबंधित लाइव्ह व्हिडिओ न्यायालयात दाखवल्यानंतर न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. साहजिकच आता केजरीवाल यांना रविवार, 2 जून रोजी दुपारी 3 वाजण्यापूर्वी तिहार कारागृह प्रशासनासमोर शरणागती पत्करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपताच त्यांना कारागृहात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रचाराच्या निमित्ताने अंतरिम जामिनावर असलेल्या केजरीवाल यांनी आरोग्याचे कारण पुढे करत नियमित जामिनासाठी प्रयत्न चालवले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर खंडपीठाने सुनावणीस नकार देत सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश जारी केले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने सुनावणी सुरू केली असली तरी त्यांना तत्काळ दिलासा दिलेला नाही. केजरीवाल यांची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणेला नोटीस बजावल्यानंतर ईडीने आपली बाजू ठामपणे मांडली. यात त्यांनी केजरीवाल हे आपल्या आरोग्याबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती जारी करत असल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे.









