भारतीय नोटेवर महात्मा गांधींसह विद्येची देवता गणपती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीचेही छायाचित्र समाविष्ट करण्याची ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी अजब तितकीच अद्भूत म्हणायला हवी. चलनी नोटांवर या दोन्ही देवतांच्या छायाचित्राचा समावेश केल्यास सगळय़ांना त्यांचा आशीर्वाद मिळण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची अपेक्षाही केजरीवाल व्यक्त करतात. वरकरणी केजरीवाल यांचा हा आशावाद सश्रद्ध वाटत असला, तरी निवडणुकांचे गणित डोळय़ासमोर ठेऊन केलेली ही खेळी आहे, हे सूज्ञास सांगणे न लगे. देशाच्या राजधानीत बस्तान बसविलेल्या केजरीवाल यांनी दिल्लीपाठोपाठ आता पंजाबवरही कब्जा मिळविला आहे. अर्थात ही दोन्ही राज्ये त्यांनी काँग्रसकडून हिसकावून घेतली आहेत. आता भाजपशासित राज्यांसह लोकसभा निवडणुकीत प्रभाव टाकण्याची केजरीवाल यांची योजना आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे गुजरात विधानसभा निवडणूक होय. गुजरात ही भाजपाची प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची गृहभूमी असलेल्या गुजरातवर वर्चस्व प्रस्थापित करता आले, तर आपोआप देशातही आपला प्रभाव निर्माण करता येईल, हे केजरीवाल जाणतात. म्हणूनच अलीकडच्या काळात त्यांनी गुजरातवर फोकस केल्याचे दिसून येते. गुजरात पादाक्रांत करायचा झाला, तर केवळ विकासाची भाषा करणे पुरेसे ठरणार नाही. हिंदुत्वाचे कार्डही खेळावे लागेल, असा दृष्टीकोन ठेऊनच केजरीवाल फासे टाकताना पहायला मिळतात. सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाला देशात सुगीचे दिवस असून, मोदी यांनी हिंदुत्वीय राजकारणाचा अवकाश पुरता व्यापून टाकला आहे. तथापि, केजरीवाल हे यातून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. खरे तर त्यांच्या या अपेक्षेची पूर्ती होण्याची शक्यता धूसर आहे. दस्तुरखुद्द केजरीवालही हे जाणून असतील. तथापि, ही मागणी मान्य झाली नाही, तरी यातून भाजपाची मतपेढी कशी गोंजारता येईल वा हळूहळू तोडता येईल, यावर त्यांचा कटाक्ष असावा. दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट, वीज-पाणीबीलमाफी अशा वेगवेगळय़ा विकासविषयक योजना व सवलतीतून केजरीवाल मॉडेलचा प्रवास झाला असला, तरी अलीकडच्या काळात सौम्य हिंदुत्वाचीही त्यात भर पडत गेली आहे. किंबहुना, मोदी यांना पर्याय देण्याकरिता हिंदुत्वाचे कार्ड अधिक ठसठशीतपणे वापरण्याची रणनीती ‘आप’चे नेतृत्व आखत आहे. स्वाभाविकच आगामी काळात हा सूर टीपेला पोहोचू शकतो. वास्तविक केजरीवाल यांची प्रतिमा विकासपुरुष, अशीच राहिली आहे. परंतु, तेच केजरीवाल देवदेवतांना अर्थव्यवस्थेशी जोडू पाहतात, तेव्हा त्यांच्यातील दांभिकपणाच अधोरेखित होतो. श्री गजानन हे विद्येचे, तर लक्ष्मी हे समृद्धीचे दैवत मानले जाते. नोटेवर या देवतांचा समावेश केला म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनात काही फरक पडेल, असे नाही. त्याऐवजी गरीब, वंचित, अभावग्रस्तांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या घरात लक्ष्मी नांदावी, याकरिता केजरीवाल यांच्या पक्षाने काही कार्यक्रम, योजना दिली असती, तर त्यांना ते अधिक शोभून दिसले असते. मात्र, आपवाल्यांचेही पाय शेवटी मातीचेच निघाले. सगळेच पक्ष आपल्या विस्तारासाठी वेगवेगळय़ा योजना आखत असतात. अनेकविध क्लृप्त्या लढवत असतात. प्रत्येक पक्षाचा हा अधिकारच आहे. त्या अर्थी आपची ही मागणी समर्थनीय ठरावी. परंतु, त्यालाही काही व्यवहार्यता असावी. आता सगळय़ाच पक्षांकडून अशाच पद्धतीची मागणी होत असून, भाजपाचे आमदार नीतेश राणे यांनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असावे, अशी सूचना केली आहे. भाजपाचेच आमदार राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही नोटेवर छापावे, असे म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी मग नोटेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र का असू नये, असा सवाल केला आहे. शिवसेना नेते अनिल परब हेही नेटेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटा असावा, अशी अपेक्षा व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी हिंदू महासभेनेही महात्मा गांधी यांच्याऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र नोटेवर वापरण्यात यावे, अशी मागणी केली होती. यातील बहुतांश मागण्या या राजकीय स्वरुपाच्या असल्याने त्यावर किती काथ्याकूट व्हावा, हाच मुळात प्रश्न आहे. त्यात गांधींचे नोटेवरील अस्तित्व पुसण्याचा काही मंडळींचा हेतूही लपत नाही. मुळात गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी दिली, ती सुभाषबाबूंनीच. गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त 1969 साली नोटेवर गांधींचा फोटो छापण्यात आला. नोटेवर गांधी आले म्हणून त्यांचे विचार आचरणात आले, आर्थिक प्रामाणिकपणा वाढला, असे नाही. म्हणूनच महापुरुषांची छायाचित्रे, पुतळे, नावे यांचा वापर करण्याऐवजी त्यांच्या विचारांचे आचरण कसे करता येईल, याला प्राधान्य असायला हवे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात व एकूणच उभारणीत अनेक नेत्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. संबंधित नेत्यांमध्ये मतमतांतरे असली, तरी कटुता वा द्वेष नव्हता. अंतिमतः या सर्वांचा उद्देश हा देशहिताचाच होता. तथापि, राजकारण्यांकडून या सर्व महनीयांचे विचार कप्पेबंद करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे दुर्दैवी होय. आज भारतासारख्या देशातील मुख्य समस्या ही गरिबी व बेरोजगारी, हीच आहे. त्यामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता सर्वपक्षीयांनी एकजुटीने पावले उचलायला हवीत. जीवन जगताना ताणतणावात वाढ होत असून, हृदयविकार व आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या प्रश्नांचे आकलन भारतातील राजकीय पक्षांना नाही का? केवळ देवदेवतांची नावे घ्यायची, मात्र जनहिताऐवजी स्वतःच्या व पक्षाच्याच उत्कर्षाला प्राधान्य द्यायचे, याला ढोंगीपणा नाही म्हणायचे, तर दुसरे काय? अशा ढोंगीपणापासून दूर राहिलेलेच बरे.
Previous Articleकाकड आरती कार्तिकातील
Next Article संशयिताच्या घरातून स्फोटकांचा साठा जप्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








