ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याकडे दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवार, 2 फेब्रुवारीलाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पक्षाने यासंबंधी लेखी निवेदन जारी केले असून अरविंद केजरीवाल शुक्रवारीही चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टीने ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी चार समन्सकडे दुर्लक्ष केले होते.
ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स जारी केले होते. यापूर्वी गेल्या चार महिन्यात त्यांनी तपास यंत्रणेची चार समन्स टाळली आहेत. अरविंद केजरीवाल यांनी गेल्यावषी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावषी 3 जानेवारी आणि 18 जानेवारीला ईडीसमोर हजर राहण्यासाठी जारी केलेले समन्स टाळले आहेत. चारही समन्समध्ये ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नसल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांना पाचवे समन्स पाठविण्यात आले होते. आपली कायदेशीर यंत्रणा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित अबकारी धोरणासंदर्भात केजरीवाल यांना बजावलेल्या समन्सचा अभ्यास करत असल्याचे आम आदमी पक्षाच्या कायदेशीर तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा 2021-22 मधील अबकारी धोरणाशी संबंधित आहे. याप्रकरणी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह सध्या तुऊंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने गेल्या वषी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यानंतर संजय सिंह यांना याच प्रकरणातील मनी लाँड्रिंगशी संबंधित आरोपांवरून 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आता अरविंद केजरीवालांनाही या प्रकरणात कारवाई करण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.









