अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये हमींचा वर्षाव करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक हमी दिली आहे. आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास गायींच्या देखभालीसाठी 40 रुपये प्रति गाय प्रतिदिन खर्च केले जाणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. भाकड गायींसाठी प्रत्येक जिल्हय़ात वेगळी व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा आयबीचा अहवाल आहे. परंतु विजयाचे मार्जिन अत्यंत कमी आहे. आमचा पक्ष फारच कमी जागांनी पहिल्या स्थानी असणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर काँग्रेस आणि भाजपच्या गुप्त बैठका सुरू आहेत. दोन्ही पक्ष आम्हाला शिव्या वाहत असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
काँग्रेस मजबूत व्हावी अशी भाजपची इच्छा आहे, यामुळे भाजपविरोधी मते विभागतील असे त्यांना वाटत आहे. काँग्रेसला ‘आप’ची मते मिळविण्याची जबाबदारी प्राप्त झाली आहे, परंतु गुजरातच्या जनतेने या दोन्ही पक्षांपासून सावध रहावे. काँग्रेसला राज्यात 10 देखील जागा जिंकता येणार नाहीत. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. याचमुळे काँगेसला मत देऊन भाजपला विजयी करू नका असे केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला उद्देशून म्हटले आहे.









