वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याच्या संदर्भात जामीन अर्ज सादर केला आहे. ते सध्या सीबीआयचे प्रमुख आरोपी असून दिल्लीच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन याचिकेवर त्वरित सुनावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या अर्जावर 13 ऑगस्टलाच सुनावणी करावी अशी मागणी त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना ही विनंती ईमेल पाठवून करण्याचा आदेश दिला. केजरीवाल यांना सीबीआयने मद्य घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी म्हणून अटक केली आहे. त्यांना अटक करण्याची सीबीआयची कृती योग्य असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. केजरीवाल यांचे सहकारी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामिनावर मुक्त करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे आपल्यालाही जामीन संमत होऊ शकेल, अशी केजरीवाल यांची अपेक्षा आहे. या प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता याही आरोपी असून त्यांनीही सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. न्यायालयाने या अर्जावर सीबीआय आणि ईडीला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे.
केजरीवाल यांना दोनदा जामीन
केजरीवाल यांच्यावर प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि सीबीआय या दोन्ही संस्थांनी गुन्हे सादर केले आहेत. यांपैकी ईडीच्या प्रकरणात त्यांना दोनदा न्यायालयाकडून जामीन संमत झाला आहे. मात्र, सीबीआय प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांची अद्याप कारागृहातून मुक्तता करण्यात आलेली नाही. ईडी प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयानेही जामीन दिला आहे.









