विरोधी युतीची खिचडी मंद आंचेवर आत्ताच कोठे शिजू लागली आहे. तिला शिजायला बराच वेळ लागणार आहे. जेव्हढा जास्त वेळ तेव्हढी ती खमंग बनणार. पण अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एका नवीन भूमिकेत समोर येत आहेत. ते झारीतील शुक्राचार्य बनू पाहात आहेत. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर ते नवीन ‘अमर सिंग’ बनू पाहत आहेत.
आधुनिक काळात देशातील राजकारणाचे व्याकरण बदलवणारे केजरीवाल यांनी पाटण्याच्या बैठकीत आडमुठी भूमिका घेऊन दिल्लीबाबतच्या वादग्रस्त अध्यादेशाचा मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यश आले नाही पण त्यामुळे विरोधी वर्तुळात त्यांना एक अनोखे टोपण नाव मिळाले आहे-‘अमर सिंग’.
पाटण्याच्या बैठकीची पूर्ण खबरबात बाहेर येईपर्यंत भाजपविरुद्धच्या लढाईतील ‘शूर सैनिक’ व्हायला निघालेले केजरीवाल आणि त्यांचा पक्षाने विरोधी युतीला अचानक राम राम ठोकला. ‘आम्ही तर केवळ अध्यादेशाविषयी काँग्रेसची भूमिका काय?’ हे विचारण्यासाठीच केवळ बैठकीत भाग घेतला होता असे सांगून केजरीवाल यांच्या पक्षाने विरोधी गोटात स्वत:ची अवस्था अजूनच अवघड करून घेतली आहे. ‘सुंठीवाचून खोकला गेला’ असेच समजून काँग्रेससह सारे विरोधी पक्ष त्यामुळे हायसे मानतील. ‘जमले तर सूत, नाहीतर भूत,’ अशीच केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाची ख्याती असल्याने तो पक्ष आपणहून विरोधी कंपूतून गेला हे एक शुभचिन्हच आहे.
केजरीवाल आत राहिले असते तर त्यांनी बरीच बेदिली माजवून विरोधी पक्षांना नाकेनऊ आणले असते, असे काँग्रेसमधील केजरीवाल विरोधक पहिल्यापासून सांगत होते. ‘एकांडे शिलेदार’ असलेले केजरीवाल हे कोणाच्या ऐकण्यातील नाहीत. पक्षावरील आपली पकड घट्ट करण्यासाठी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. लोकसभेच्या निवडणूका आपण आता स्वबळावर लढू असे जाहीर करून आम आदमी पक्षाने स्वत:ला अडचणीत आणले आहे असे मानले जाते. याला कारण असे की राष्ट्रीय निवडणूका केवळ नऊ महिन्यावर आलेल्या असताना भाजप आणि गैरभाजप पक्षांच्या तगड्या तटबंद्या उभ्या राहात आहेत व त्यात केजरीवाल एकटे पडून स्वत:चीच शोभा करून घेतील असा सूर राजकीय वर्तुळात लावला जात आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत केजरीवाल यांचा पक्ष बऱ्याच जागा लढला होता पण अक्षरश वाऱ्यावर उडून गेला होता हे चांगले लक्षण नव्हे. विरोधी युतीच्या सद्य हालचालीत ते वादग्रस्त अमर सिंगांचे नवीन अवतार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ही ओळख खचितच चांगली नाही. कारण काही वर्षांपूर्वी दिवंगत झालेले अमर सिंग म्हणजे दिल्लीच्या राजकीय दरबारात पॉवर ब्रोकर, सत्तेचे दलाल म्हणून ओळखले जात होते. त्यांना राजकारणातील साधनशुचितेचे अजिबात सोयरसुतक नव्हते.
याउलट केजरीवाल म्हणजे अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून पुढे आलेला दिल्लीतील जन नेता होय. केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या उदयाने काँग्रेससारखा भलामोठा पक्ष राजधानीतून एका रात्रीत जणू गायब झाला. भाजप राजधानीत बऱ्यापैकी उरली आहे ती केंद्रात मोदी सरकार असल्याने आणि ते तिकडंबाजीचे राजकारण करण्यात पटाईत असल्याने. विधानसभा निवडणुकात केजरीवाल यांनी भाजपला दोनदा आपटले तर म्युनिसिपल निवडणुकात भाजपची सत्ता हिसकावून घेतली.
केजरीवाल हे एव्हढे बेणे काम की त्याने आपले काम झाल्यावर आपल्या गुरुलाच वाऱ्यावर सोडले असे त्यांचे टीकाकार म्हणतात. संदर्भ आहे तो अण्णा हजारेंचा. नवीन परिस्थितीत केजरीवाल म्हणजे भाजपचे ‘वोट कटवा’ म्हणून काम करणार असा विरोधी पक्षांनी सूर लावला तर तो फारसा चुकीचा ठरणार नाही. सहा महिन्यापूर्वी गुजरातमधील विधानसभा निवडणूकीत केजरीवाल यांनी धुवाँधार प्रचार करून ‘आप’ ची हवा कशी पसरली आहे असे भासवले होते पण प्रत्यक्षात ‘आप’ मुळे भाजपची चांदी झाली होती. केजरीवाल यांनी काँग्रेसची बरीच मते खाऊनदेखील त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. केजरीवाल यांनी आता हे ‘गुजरात
मॉडेल’ लोकसभेत पसरवले तर त्याचा अर्थ म्हणजे ते विरोधी पक्षांना अपशकुन करणार असा होतो.
केजरीवाल यांचे दोन माजी मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. केंद्राने ज्या पद्धतीने स्क्रू आवळणे सुरु केले आहे त्याने आज ना उद्या दिल्लीचे मुख्यमंत्रीच तुरुंगात जातील असे भाजपाई तसेच कॉँग्रेसी म्हणत आहेत. तसे घडले तर आम आदमी पक्षाचा सारा डोलाराच कोसळेल. एकेकाळी राहुल गांधींना भंपक समजणारे आणि स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकमेव प्रतिस्पर्धी समजणारे केजरीवाल म्हणूनच घायकुतीला आलेले आहेत. विरोधी पक्षातील एक गट मात्र आम आदमी पक्ष म्हणजे भाजपने उभे केलेले बुजगावणे आहे आणि दिल्लीत जे काही सुरु आहे ते लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे नाटक होत आहे. पुढील काही महिन्यात केजरीवाल आणि त्यांचा पक्ष काय राजकारण करतात त्यावर ते नवीन ‘अमरसिंग’ झालेत की नाही ते दिसून येणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर
सत्ताधारी मंडळी ही फक्त आपलीच जास्त चर्चा प्रसारमाध्यमात व्हावी याकरता काहीही करतात असा एक संशयरूपी समज राजाधानीतील राजकीय वर्तुळात बळावत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे अशा प्रकारची सुरु झालेली चर्चा त्याचाच भाग आहे की प्रत्यक्षात तसे घडणार आहे हे नजीकच्या भविष्यकाळात कळेल. जर पंतप्रधानांनी खरोखरच एवढ्या शेवटच्या क्षणी विस्तार केला तर त्याने काय साधणार आहे? असा प्रश्न भाजपाईच विचारू लागले आहेत. पुढील सहा-सात महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूका जाहीर होतील असे असताना आताच कोणाला मंत्री नेमले तरी तो करणार काय? हा मोठा प्रश्न उद्भवतो. गेल्या साडेचार वर्षात केंद्रीय मंत्र्यांनी सामान्य खासदारांची फारशी कामे केलेली नाहीत आणि त्यांच्याबरोबर फारशा भेटीगाठी देखील केलेल्या नाहीत, याबाबत राजधानीत बरीच चर्चा ऐकू येते. अशावेळी मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने कोणी खुश होईल असा प्रकार सध्या तरी दिसत नाही. ‘पंतप्रधानांनी भाजपला सत्तेत आणले आहे. पक्षाला सत्तेतून घालवण्याचा अधिकार एकमेव त्यांनाच आहे’, असे एका खासदाराने सांगून मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारमधील सारे काही तेच ठरवतात. दुसऱ्यांना त्याची काहीच कल्पना नसते असेच कबुल केले आहे. बंगळूर येथे येत्या पंधरवड्यात विरोधी पक्षांची युतीवरील दुसरी बैठक होत आहे याची घोषणा महाराष्ट्रात शरद पवार यांनी केली, त्यालादेखील एक आगळे महत्त्व आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार असोत अथवा शरद पवार अशा विरोधी नेत्यांना काँग्रेस हेतुपुरस्सर पुढे करून युतीचा एक चांगला संदेश देत आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा डंका वाजू लागला असताना भाजपला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही त्यागाला तयार आहे असे जे सूचित केले जात आहे त्याने ही युती अजूनच घट्ट होण्याची चिन्हे आहेत. 2024 ची निवडणूक ही साधीसुधी राहणार नसून इतिहास घडवणार आहे अशी भाकिते होत असताना भाजप देखील कामाला लागली आहे.
सुनील गाताडे








