ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी रविवारी दावा केला की काश्मिरी पंडितांना (kashmir pandit) घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे, तसेच केंद्र सरकारने काश्मीरमधील लक्ष्यित हत्या थांबवण्यासाठी कृती योजना तयार करावी अशी मागणी करत भाजपवर हल्लाबोल केला.
जंतर-मंतर येथे आम आदमी पक्षाच्या (AP) ‘जन आक्रोश रॅली’ला संबोधित करताना ते म्हणाले, काश्मीरमधील घटनांवरून दिसून येते की भारतीय जनता पक्ष (भाजप) काश्मीर मधील परिस्थिती हाताळू शकत नाही आणि ते केवळ खराब राजकारण करत आहे. तसेच काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
पाकिस्तानने डावपेच थांबवावेत
“पाकिस्तानने क्षुल्लक डावपेच करू नयेत त्यांनी ते थांबवावेत असे मी त्यांना सांगू इच्छितो,” असे केजरीवाल यांनी काश्मीरमधील लक्ष्यित हत्यांविरोधात पाकिस्तानला सुनावले. काश्मीर आमचा होता आणि नेहमीच भारताचा भाग राहील… भारताने ठरवले तर पाकिस्तान टिकणार नाही, असा इशाराही यावेळी केजरीवाल यांनी दिला आहे.
काश्मीर मधील हत्येवर गृहमंत्र्यांशी चर्चा करणार
काश्मीरमध्ये लोकांच्या दररोज हत्या होत आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांच्याबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि काश्मीरमधील हत्या थांबवण्याच्या केंद्राच्या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ घेतील आहे. लवकरच अमित शाहांबरोबर या विषयावर चर्चा होईल असे ते म्हणाले.
काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पडलं जातंय
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, काश्मिरी पंडितांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे. १९९० च्या दशकात जे घडले तेच पुन्हा घडत असल्याचे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा-जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक रॅलीत म्हणाले, “भाजप काश्मीर मधील परिस्थिती हाताळू शकत नाही आणि यावर राजकारण कसे करायचे हे त्यांना माहीत आहे. कृपया काश्मीरवर राजकारण करू नका. “भाजप सरकार काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे. ते फक्त बैठका घेतात, पण त्यांच्याकडे काही योजना नाही. या विषयावर अनेक बैठका झाल्या आणि आता सर्वांना कृती आराखड्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. “जेव्हा काश्मीरमध्ये खून होतो, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेत असल्याचे सांगितले जाते, परंतु कृती योजना कुठे आहे?” असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल म्हणाले, “काय प्लान आहे? काश्मीरला कृती योजना हवी आहे. मी काल पाहिले की तीन तास उच्चस्तरीय बैठक झाली. अनेक बैठका झाल्या. कृपया कारवाई करा. लोक मरत आहेत.” असेही ते म्हणाले.









