काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान पेलावे लागणार : मुख्यमंत्री आतिशींना कालकाजी मतदारसंघाची उमेदवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 38 उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी जारी केली आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तर मुख्यमंत्री आतिशी या पुन्हा एकदा कालकाजी येथून निवडणूक लढवतील. अशाचप्राकरे सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलास येथून पक्षाचे उमेदवार असतील. आम आदमी पक्षाने कस्तुरबा नगर मतदारसंघात आमदार मदनलाल यांचे तिकीट कापून रमेश पहलवान यांना संधी दिली आहे. रमेश पहलवान आणि त्यांच्या नगरसेविका पत्नी कुसुम लता यांनी रविवारीच भाजपला रामराम ठोकत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
बाबरपूर येथे मंत्री गोपाल राय आणि तिलकनगर येथे जरनैल सिंह निवडणूक लढवतील. सत्येंद्र कुमार जैन शकूर बस्तीमधून, ओखला येथे अमानतुल्ला खान, मुकेश कुमार अहलावत हे सुल्तानपूर माजरा येथून, रघुविंदर शौकीन हे नांगलोई जाट येथे, सोम दत्त हे सदरबाजार येथून पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार आहेत.
इमरान हुसैन यांना बल्लीमारान मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने बुराडी येथे संजीव झा, बादली येथे अजेश यादव, रिठाला येथे मोहिंदर गोयल, बवाना येथे जय भगवान, शालीमार बाग येथे वंदना कुमारी, त्रिनगर येथे प्रीति तोमर, वजीरपूर येथे राजेश गुप्ता आणि मॉडेल टाउनमध्ये अखिलेश पती त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे.
आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांवरील स्वत:चे उमेदवार घोषित केले आहेत. पक्ष पूर्ण आत्मविश्वास आणि पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवत आहे. भाजपकडे स्वत:चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही तसेच टीम देखली नाही. याचबरोबर भाजपकडे दिल्लीसाठी कुठलेही व्हिजन नाही. केजरीवाल हटाओ हाच केवळ भाजपचा नारा आहे. आमच्या पक्षाकडे दिल्लीवासीयांच्या विकासासाठी व्हिजन आहे. प्लॅन असून तो लागू करण्यासाठी सुशिक्षित लोकांची एक चांगली टीम आहे. मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची मोठी यादी असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
संदीप दीक्षित निवडणुकीच्या मैदानात
काँग्रेसकडुन नवी दिल्ली या हायप्रोफाइल मतदारसंघात संदीप दीक्षित यांना उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात आहे. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. नवी दिल्ली हा मतदारसंघ शीला दीक्षित यांचा बालेकिल्ला राहिला आहे. याचमुळे नवी दिल्ली मतदारसंघात यावेळी अत्यंत मोठी चुरस दिसून येणार आहे.









