केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा मुद्दा : संसदेत समर्थन करणार असल्याचे आश्वासन
वृत्तसंस्था /चेन्नई
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चेन्नईचा दौरा करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची गुरुवारी भेट घेतली आहे. दिल्ली सरकारच्या विरोधातील केंद्राच्या अध्यादेशावर आम्ही चर्चा केली. हा अध्यादेश लोकशाहीविरोधी आणि घटनाबाह्या आहे. या अध्यादेशाच्या विरोधात आम आदमी पक्षाला समर्थन करण्याचे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही, काँग्रस देखील या लोकशाहीविरोधी अध्यादेशाच्या विरोधात आम्हाला समर्थन देईल अशी अपेक्षा असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल एक चांगले मित्र आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार उपराज्यपालांचा वापर करून दिल्ली अन् तेथील आप सरकारवर दबाव निर्माण करत आहे. केंद्र सरकारच्या दिल्लीशी संबंधित अध्यादेशाला द्रमुक विरोध करणार आहे. इतर नेत्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही चर्चा केली आहे. अरविंद केजरीवालांना समर्थन करण्याचे आवाहन मी सर्व नेत्यांना करत असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. स्टॅलिन यांच्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आप खासदार संजय सिंह, राघव चड्ढा, दिल्लीच्या मंत्री आतिशी उपस्थित होत्या. केजरीवालांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माकप महासचिव सीताराम येच्युरी यांची भेट घेतली आहे.









