दोन्ही नेत्यांना उपस्थित राहण्याचा होता आदेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीविषयी शंका व्यक्त करणारे अवमानजक विधान केल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंग हे न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. केजरीवाल आणि संजयसिंग यांनी दिल्लीत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचे कारण दाखवत न्यायालयाकडे कालावधीवाढ मागितली होती. या प्रकरणी गुजरातच्या न्यायालयात सुनावणी होत आहे. गुजरात विद्यापीठाने या दोन्ही नेत्यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण सादर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विद्यापीठाकडून घेतलेली पदवी बनावट आहे, असा आरोप केजरीवाल आणि संजयसिंग यांनी केला होता. नंतर गुजरात विद्यापीठाने हा आरोप खोडून काढताना त्यांची पदवी सत्य असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी गुजरात विद्यापीठावरच काही आरोप केले होते. त्यामुळे विद्यापीठाने या दोन्ही नेत्यांवर मानहानीचे प्रकरण दाखल केले आहे.
पदवी प्रमाणपत्र वेबसाईटवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात शंका उपस्थित केल्यानंतर गुजरात विद्यापीठाने त्यांचे पदवी प्रमाणपत्र वेबसाईटवर प्रसिद्ध केले होते. तरीही या दोन्ही नेत्यांनी गुजरात विद्यापीठावर सत्य दडविल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होत आहे, असे विद्यापीठाने आपल्या आवेदनात स्पष्ट केले होते. हे प्रकरण अहमदाबाद येथींल न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुरु असून गुरुवारी दोन्ही नेत्यांना उपस्थित राहण्याचा आदेश होता.









