तळेरे : प्रतिनिधी
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे आणि निसर्ग मित्र परिवार,सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग मधील सामाजिक परिक्षेत्र तळेरे,राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलमध्ये वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पृथ्वीवरील वने,माती,हवा,पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, वृक्षतोडीमुळे होणारी हानी लक्षात घेऊन त्यांची मनुष्याला असणारी गरज प्रत्येकाने ओळखली पाहिजे व याविषयीची जनजागृती करण्यासाठी वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे मार्फत “वृक्षदिंडी” काढण्यात आली.ही दिंडी प्रशालेपासून-तळेरे बाजारपेठ व पुन्हा प्रशाला अशी काढण्यात आली होती.यावेळी प्रशालेच्या लेझीम पथकामार्फत लेझीम नृत्य तसेच वृक्षपालखी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.त्यानंतर प्रशालेच्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या रोपांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी माजी सभापती दिलीप तळेकर,सरपंच हनुमंत तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,शशांक तळेकर,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष तसेच पत्रकार संजय खानविलकर,सचिव व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव,सामाजिक वनीकरण खारेपाटण विभागाचे वनपाल शिवाजी दत्तात्रय इंदूलकर, वनरक्षक राजश्री शेवाळे, शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, निलेश सोरप, प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी 33% क्षेत्र हरित अच्छादनाखाली म्हणजेच वनाखाली असणे आवश्यक आहे.मात्र दिवसेंदिवस यातही घटच होत आहे.गेल्या 25 वर्षात 300 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली. म्हणूनच वृक्ष लागवड करणे व त्यांच्या रक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश ठेवून या उपक्रमाचे आयोजन प्रशालेमार्फत करण्यात आले. यावेळी नारळ,आवळा,आपटा,कोकम, फणस, बहावा,करंज,काजू,आंबा,फुलझाडे अशा प्रकारच्या जवळपास 35-40 वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे,आपली पृथ्वी तसेच आपला परिसर स्वच्छ सुंदर व हरित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची गरज आहे असे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तर सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे पृथ्वीचे आरोग्य राखण्यामागे झाडे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन सरपंच हनुमंत तळेकर यांनी केले. त्याचप्रमाणे निसर्ग मित्र परिवाराचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद करून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले तसेच प्रशालेच्या या उपक्रमाबद्दल प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचे कौतुक केले.तसेच प्रशालेचे उपक्रम नेहमीच स्वागतार्ह असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.वृक्षदिंडी दरम्यान रिक्षा संघटना,तळेरे यांनीही उपक्रमाचे कौतुक केले.हा उपक्रम प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवून सहा.शिक्षक व्ही.डी.टाकळे,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वीपणे संपन्न झाला.