विजय देवणे यांचे आवाहन, शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आज चौथी पिढी लढ्यामध्ये सक्रिय आहे. काय मिळेल, याचा विचार न करता प्रत्येक आंदोलन नि:स्वार्थी भावनेने सुरू आहे. परंतु आता निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे. लढाई तेवत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तयारी असली तरी पुढच्या पिढीला या यातना सहन करण्याची वेळ येऊ न देणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे विचार कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी मांडले.
शिवसेना सीमाभागच्यावतीने शनिवारी शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सम्राट अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात विजय देवणे बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसैनिकांसह म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने नेहमीच महत्त्वाची भूमिका घेतली आहे. आजतागायत प्रत्येक आंदोलनात शिवसेना मराठी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सीमाप्रश्न कसा सुटेल, तसेच भविष्यात कोणती आंदोलने करावी लागतील यासाठी आता शिवसेनेने महाराष्ट्रात पुढाकार घ्यावा, असे विचार त्यांनी मांडले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, कोल्हापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, दिगंबर पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्ता पाटील, विनायक बेळगावकर, राजू कणेरी, दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, जयराम मिरजकर, रमेश माळवी, विजय सावंत, महेश टंकसाळी, नारायण मासरणकर, शुभम शेळके, धनंजय पाटील, मुरलीधर पाटील, आर. एम. चौगुले, मनोज पावशे, नेताजी जाधव, अंकुश केसरकर, अॅड. अमर येळ्ळूरकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, तसेच म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध
महाराष्ट्रातील अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अशा व्यक्तींकडून इतिहासाची तोडमोड केली जात असून कारवाईची मागणी मालोजी अष्टेकर, विजय देवणे यांनी करत राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.









