सर्वोच्च न्यायालयाची जामीन प्रकरणात टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जे लोक कारागृहात आहेत, त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका जामीन प्रकरणाची सुनावणी करताना केली आहे. ही जामीन याचिका ताहीर हुसेन याने सादर केली होती. दिल्ली दंगल प्रकरणी तो कारागृहात आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यासाठी आपली जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी त्याने केली होती. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी 21 जानेवारीला ठेवली आहे.
न्या. पंकज मिथल आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या समोर ही सुनावणी होत आहे. कारागृहात राहून निवडणूक जिंकणे सोपे आहे. मात्र, असे करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे. कारागृहात असलेल्यांना निवडणुका लढविण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. ताहीर हुसेन हा एआयएमआयएम या पक्षाचा उमेदवार असून तो मुस्तफाबाद मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहे. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीर्यंत जामीन संमत केला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप या प्रकरणात आपला अंतिम आदेश दिलेला नाही. मात्र, गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यास अनुमती असू नये, असे मतप्रदर्शन केले आहे.
आरोपांचे गांभीर्य महत्वाचे
जामीन संमत करताना आरोपांच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ताहीर हुसेन हा दिल्ली दंगल प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. या दंगलीत अनेकांचा मृत्यू झाला होता. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला निवडणूक लढविण्यासाठी जामीन संमत करता येणे अवघड आहे. दंगलींच्या संदर्भात त्याच्यावर 11 एफआयआर सादर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत त्याला कारागृहातून बाहेर सोडणे योग्य नाही, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली.
मुख्य आरोपी आणि अर्थसाहाय्यक
2020 मध्ये दिल्लीत झालेल्या भीषण दंग्यांचा ताहीर हा मुख्य सूत्रधार आहे. तसेच या दंगलीला त्याने मोठ्या प्रमाणात वित्तसाहाय्य केले होते, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आपण 4.9 वर्षे कारागृहात काढलेली आहेत. आपल्याविरोधात अभियोगाची कार्यवाहीला आता प्रारंभ झाला आहे. तथापि, आपण दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत असून आपला उमेदवारी अर्ज संमतही करण्यात आला आहे. आपल्या विरोधात 114 साक्षीदार असून केवळ 20 जणांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपुरता मला जामीन संमत करा, अशी मागणी त्याने आपल्या याचिकेत केली होती.









