सफाई कामगारांची मागणी : मनपाची घरकुलांबाबत बैठक
बेळगाव : महापालिकेच्या सफाई कामगारांना घरकुलांचे स्वाधीन पत्र आणि हक्कपत्र देण्यासंदर्भात शुक्रवार दि. 7 रोजी महापालिकेच्यावतीने कुमार गंधर्व रंगमंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना क्वॉर्टर्स, भूखंड आणि गृहभाग्य योजना असे तीन प्रस्ताव ठेवले. मात्र, यावेळी सफाई कामगारांनी आपल्याला जुनेच क्वॉर्टर्स देण्यात यावेत, अशी मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून सफाई कामगारांच्या घरकुलाच्या प्रŽाबाबत सातत्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने यापूर्वीच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी 197 सफाई कामगारांना स्पीडपोस्टने पत्र पाठविण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वांना बायहॅन्ड दिली पत्रे
बैठकीच्या अध्यक्षस्थानी काळजीवाहू महापौर सविता कांबळे होत्या. व्यासपीठावर मनपा आयुक्त शुभा. बी., प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी उपस्थित होते. सुऊवातीला आरोग्य विभागाचे व्यवस्थापक अभिषेक यांनी उपस्थित सफाई कामगारांना घरकुलांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांकडून मते जाणून घेतली. यावेळी सफाई कामगार जिल्हा व्हिजीलन्स कमिटीचे सदस्य विजय निरगट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेने 197 सफाई कामगारांना स्पीडपोस्टने पत्र पाठवली आहेत का? याबाबत आधी खुलासा करावा, अशी मागणी केली.
त्यावेळी सर्वांना बायहॅन्ड पत्रे देण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.
शहरात आनंदवाडी येथे 198 क्वॉर्टर्स, आझनगरनगरला 50 आणि नेहरूनगरला 16 क्वॉर्टर्स आहेत. 1973 मध्ये 55 सफाई कामगारांना स्वाधीन पत्र देण्यात आले आहेत. त्यानंतर अन्य 25 जणांना घरकुलांचे स्वाधीन पत्र देण्यात आले आहे. उर्वरित 30 सफाई कामगारांना घरकुलांचे स्वाधीन पत्र देण्यात आलेले नाही. यापैकी 10 सफाई कामगारांची माहिती महापालिकेकडे नसल्याने त्यांची माहिती सफाई कामगार हितरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा करून द्यावी, अशी विनंती यावेळी अधिकाऱ्यांनी केली. त्याला हित रक्षण समितीतर्फे होकार दर्शविला. बैठकीला केवळ 16 पात्र सफाई कामगार उपस्थित होते. त्यांनी सध्या वास्तव्यास असलेले जुने क्वॉर्टर्सच आपल्याला कायम ठेवावीत, अशी मागणी केली. यावेळी मुलीस्वामी भंडारी, मालती सक्सेना, यल्लेश बळ्ळारी आदी उपस्थित होते.









