मातेचे दूध वयाच्या सातव्या वर्षापर्यंत प्याल्यास बालक बुद्धिमान बनते, असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. हा शोध बऱयाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अमेरिकेतील संशोधकांना लागला आहे. आईचे दूध नवजात बालकांसाठी सर्वोत्तम आहार असते. हे आजवर माहित होते. तथापि ते जितकी अधिक वर्षे प्याले जाईल, तितकी बुद्धीची वाढ अधिक होते हा नवा शोध आहे. मानसाच्या मेंदूची वाढ वयाच्या नवव्या ते दहाव्या वर्षापर्यंत होत असते. त्यानंतर ती थांबते. याच कालावधीत जास्तीतजास्त वर्षे म्हणजेच सहाव्या ते सातव्या वर्षापर्यंत मातेचे दूध बालकाला मिळाल्यास त्याच्या बुद्धीचा स्तर मोठय़ा प्रमाणात वाढतो. शिवाय रोगप्रतिकार शक्तीही अधिक विकसित होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील संशोधक मँडी ब्राऊन बेलफोर्ट आणि त्यांच्या सहकाऱयांनी यावर विशेष संशोधन केले आहे. ज्या मुलांचा जन्म निर्धारित वेळेपेक्षा अधिक होतो त्यांच्यासाठी सात वर्षांपर्यंत मातेचे दूध प्राशन करणे अधिक लाभदायक ठरू शकते. यात एक अडचण अशी की सातव्या वर्षापर्यंत मातेच दूध मिळणार कसे? यावर हे संशोधक अधिक प्रयोग करीत आहेत. बालक सात वर्षाचे होईपर्यंत मातेचे दूध त्याला उपलब्ध व्हावे यासाठी त्याला विशेष प्रकारचा आहार देता येईल का? यावर संशोधन सुरू आहे. मातेचे दूध आणि बौद्धीक क्षमता यांचा संबंध जोडण्यासाठी या संशोधक दलाने मोठय़ा प्रमाणात सर्वेक्षणे केली आहेत. त्यातून काढलेले निष्कर्ष अहवालाच्या स्वरुपात मांडण्यात आले आहेत. सिद्धांतापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता असली तरी मुख्य निष्कर्ष अचूक आहे, असे बेलफोर्ट आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून सांगितले जाते.









