प्रेरणादायी वक्ते चकोर गांधी : इनरव्हील क्लब-जीआयटी रोटरॅक्ट क्लबतर्फे ‘माईंड मजे’ कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या सुरक्षित चौकटीतून बाहेर या, स्वत:लाच आव्हान द्या, स्वत:ला अधिक गतीने उत्तम घडविण्यासाठी प्रयत्नशील रहा, दूरदृष्टी ठेवा आणि पुढील टप्प्यांमध्ये आपण स्वत: काय करणार आहोत, काय करू शकतो हे निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध रहा, अशा टिप्स प्रेरणादायी वक्ते चकोर गांधी यांनी दिल्या.
इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव व जीआयटी रोटरॅक्ट क्लब यांच्यावतीने आयोजित दि. 8 रोजी ‘माईंड मजे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक राम भंडारे, दीपक धडोती, इनरव्हील अध्यक्षा मेधा शहा, सचिव ममता जैन, जय भारत फौंडेशनचे समीर कणबर्गी, रोटरॅक्ट सचिव स्वाती भट, समन्वयक प्राजक्ता पाटील उपस्थित होते.
चकोर गांधी यांनी आवड, दूरदृष्टी, ध्येयनिश्चिती, नेटवर्किंग, आव्हानांचा सामना, सांघिकता अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन केले. यानंतर शार्क टँक हा भविष्यातील उद्योजकांसाठी व्यासपीठ देणारा कार्यक्रम झाला. याचे परीक्षण उद्योजक दीपक धडोती, विप्लव बेलवल, सर्वेश कक्केरी व श्वेता कानूरकर यांनी केले. कठोर मूल्यमापनानंतर पाच संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. शिवाय दोन वाईल्ड कार्ड एंट्रीजना प्रवेश देण्यात आले. याचबरोबर मॉक प्रेस हा कार्यक्रमही झाला. परीक्षक म्हणून डॉ. माधव प्रभू व स्वाती जोग यांनी काम पाहिले.
प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मेधा शहा यांनी स्वागत केले. त्यानंतर दोन्ही क्लबच्यावतीने चकोर गांधी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सोनल धामणकर यांनी त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन पुष्पा देशपांडे व अवंती कनगुटकर यांनी केले.









