तृणमूल स्थापना दिनी कार्यकर्त्यांना संदेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसने सोमवारी स्वत:चा स्थापना दिन साजरा केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. वाईट शक्तींना विरोध आणि लोकांच्या लोकशाहीवादी अधिकारांच्या रक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष जारी ठेवण्याच्या प्रतिबद्धतेवर ममतांनी जोर दिला आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात वर्चस्व राखून असलेला तृणमूल काँग्रेस आता 26 वर्षांचा झाला आहे.
तृणमूलची स्थापना 1 जानेवारी 1998 रोजी करण्यात आली होती. पक्षाला पश्चिम बंगालच्या राजकारणात स्वत:चे स्थान बळकट करण्यास सुमारे एक दशकांचा कालावधी लागला आहे. राज्यात तृणमूलला पहिल्यांदा 2011 मध्ये बहुमत मिळाले होते. ज्यानंतर झालेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलने बहुमत मिळवून सत्ता राखली आहे. 2011 पासून ममता बॅनर्जी याच राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.
देशाच्या सर्वसामान्य लोकांसाठी मी लढाई सुरूच ठेवणार आहे. लोकांच्या अतूट समर्थनाच्या बळावर आम्ही या महान लोकशाहीवादी देशात सर्वांसाठी आवाज उठवत राहू. कुठल्याही वाईट शक्तीसमोर आम्ही शरणागती पत्करणार नाही. सर्वप्रकारच्या दहशतीविरोधात संघर्ष करत राहू असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मातृभूमीचा सन्मान करणे, राज्याच्या हितांसाठी काम करणे आणि जनतेच्या लोकशाहीवादी अधिकारांच्या रक्षणासाठी दृढविश्वास नजरेसमोर ठेवून तृणमूल काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता अणि समर्थकाचे समर्पण आणि आत्मबलिदानाचा मी सन्मान करते असे उद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले आहेत.









