विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे ग्रंथपालांची मागणी
बेळगाव : नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि पर्यवेक्षकांच्या वेतनात वाढ करा, नोकरीत कायम करा, ग्रंथालयात सोयी-सुविधा पुरवा, कामात बढती द्या आदी मागण्यांसाठी सोमवारी कर्नाटक राज्य नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रंथपाल आणि पर्यवेक्षक संघाने विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. महानगरपालिका कार्यक्षेत्रात ग्रंथालयांची संख्या मोठी आहे. मात्र येथील ग्रंथपाल आणि पर्यवेक्षकांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. काही ग्रंथालयात 35 वर्षे ग्रंथपाल काम करू लागले आहेत. मात्र त्यांना बढती आणि इतर सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. ग्रंथालयात पुस्तके, दैनिके, मासिके, मुबलक उपलब्ध नसल्याने वाचकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. शासनाकडून विविध वृत्तपत्रे व मासिके उपलब्ध करावीत. काही ग्रंथालयांमध्ये महिला कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ग्रंथालयाची वेळ निश्चित करावी. शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने कॅशलेस कार्ड वितरण करावे. आदी मागण्याही ग्रंथपाल आणि पर्यवेक्षकांनी आंदोलनाद्वारे केल्या आहेत.









