वेतनवाढही देण्याची संघटनेची मागणी
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, किमान वेतन 26 हजार रुपये द्यावे, निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन द्यावी, अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी सीआयटीयूच्या नेतृत्वात मंगळवारी महिला-बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे. आजच्या महागाईच्या दिवसांत कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे. अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित, असंघटित, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील. महागाई दिवसेंदिवस वाढत असून गरीब कुटुंबांना जीवन चालविणे कठीण जात आहे. महागाई नियंत्रणात आणावी, अन्नधान्य, औषधे, कृषी उपकरणे, यासारख्या अत्यावश्यक घटकावरील जीएसटी रद्द करण्यात यावे, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यावरील शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.









