जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : बकरी ईद हा सण 29 जून रोजी आहे. या सणानिमित्त जनावरांची बेकायदेशीर तस्करी तसेच हत्या रोखण्यासाठी कठोरात कठोर पाऊल उचला, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. उत्सव साजरा करताना सरकारने ज्या मार्गसूची घालून दिल्या आहेत, त्या नियमांचे प्रत्येकाने पालन केलेच पाहिजे. बकरी ईददरम्यान अनधिकृतरित्या गायी तसेच इतर पशुंची हत्या होत असेल तर त्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक तसेच हत्या होत असेल तर त्यावर नजर ठेवावी. कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर काम होता कामा नये. याची दखल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव साजरा केला जाईल. सामुदायिक प्रार्थना ठिकाणी सर्व ती व्यवस्था करण्याची सूचनादेखील यावेळी केली आहे. सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ती टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., पशु वैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर, मनपाचे अधिकारी याचबरोबर मोहम्मदहनीफ बेपारी, मोहम्मदगौस बेपारी, बाबुराव मुजावर, साजिद सय्यद, मोहसीन बेपारी यांच्यासह इतर मुस्लीम बांधव उपस्थित होते.









