निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला पैसे देणे, कुकर, घरगुती भांडी, साड्या यासह मोफत कुपन दिल्यास संबंधितांवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखविणे हा गुन्हा आहे. तेव्हा इच्छुक उमेदवार तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. कोणत्याही ठिकाणी अशा वस्तू आढळल्यास त्या जप्त करण्यात येणार आहेत. मोफत नाटक आयोजित करणे किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, त्याचे कुपन देणे, पेट्रोलसाठी मोफत कुपन देणे हा देखील गुन्हा आहे. अशाप्रकारे कोणालाही वितरणासाठी परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
21 चेकपोस्ट सुरू
सध्या जिल्ह्याच्या विविध सीमेवर चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी गोदाम बांधून साहित्य ठेवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावरही नजर ठेवण्यात आली असून त्याठिकाणी धाड टाकून सर्व वस्तू जप्त केल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. सध्या 21 चेकपोस्ट सुरू आहेत. आता आणखी लवकरच काही ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
33 जणांना केले तडीपार
कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या 33 जणांना तडीपार करण्यात आले आहे. अशाप्रकारे कोणतेही गैरप्रकार केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बॅनर किंवा कोणतेही साहित्य लावताना महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व ग्राम पंचायतकडून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. बॅनर किंवा प्रचाराची पोस्ट परवानगी शिवाय पाठविता येणार नाही. कोणीही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
80 वर्षे झालेल्या वृद्धांसाठी पोस्टल बॅलेट, ऑनलाईनच्या माध्यमातून मतदान
80 वर्षे झालेल्या वृद्धांसाठी पोस्टल बॅलेट तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून मतदान करण्याची मुभा उपलब्ध करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर अपलोड करू नयेत, असेही त्यांनी सांगितले. लवकरच आचारसंहिता लागू होणार असून ती भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. निवडणुका या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनीही निवडणुकी संदर्भातील माहिती दिली. सर्वांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत प्रचार करावा, असे सांगितले. महाराष्ट्र, गोवा या राज्यांच्या सीमेवर नजर आहे. त्याठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा प्रशासन जो आदेश देईल त्यानुसार काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोवर, अप्परजिल्हाधिकारी के. टी. शांताला, वनरक्षक अधिकारी हर्षा बानु यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जोमाने कामाला लागा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यापुढेही अधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. सीमेवर तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांचे पथक नेमावे, त्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवावी, याचबरोबर अवैधरित्या गोडावून, कारखाने व घरांमध्ये वस्तू आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









