कोल्हापूर :
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे शासन खडबडून जागे झाले आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक बसस्थानकात सीसीटीव्ही बसवण्यासह सुरक्षा वाढवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे कोल्हापूर विभागात या कामांना गती आली आहे. कोल्हापूर आगारातील सर्व अधिकाऱ्यांची यासाठी धावपळ सुरु आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेववण्याच्या सूचना आगार व्यवस्थापक अनिल म्हेतर यांनी ‘मेस्को’या सुरक्षा कंपनीला दिल्या आहेत.
स्वारगेट बसस्थानकात बसमध्येच तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेमुळे एसटीची महिला व मुलीसाठी असलेली सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी आहे हे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व आगारांत असलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊन महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चालक – वाहकांना बॅच बिल्ला, नेमप्लेट, गणवेश अनिवार्य केला आहे. त्याप्रमाणे सर्व आगारामध्ये या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अनेक गैरसोयी असल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले आहे. यामुळे आगार व्यवस्थापकांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आगारातील सर्व अधिकारी झाडून कामाला लागले आहेत. विनावापर बसेस हलवण्यासाठी विभाग नियंत्रकांना पत्र दिले आहे. यामुळे दोन दिवसात विनावापर बसेस हलवल्या जाणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था ‘मेस्को’ कंपनीकडे आहे. यामुळे आगार व्यवस्थापकांकडून या कंपनीला स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सीसीटीव्हीची संख्या वाढवणार
संपूर्ण बसस्थानकात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. बंद असलेले सीसीटीव्ही सुरु करण्यात येत आहेत. तर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
अनिल म्हेतर– आगार व्यवस्थापक, कोल्हापूर
कोल्हापूर बसस्थानकात फलाट – 22
सध्या सीसीटीव्हींची संख्या – 22








