वायुदल प्रमुखांचे वक्तव्य ः महिला अग्निवीरांची पुढील वर्षी भरती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वायूदल दिनापूर्वी वायूदल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत ‘एअर वॉरियर’ची भरती करण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये 3 हजार अग्निवीर वायुदलात सामील होणार आहेत. तर महिला अग्निवीरांची भरती पुढील वर्षी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी सीमेवरील चीनच्या हालचालींवर करडी नजर असल्याचे म्हटले आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांमधून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले आहे. तरीही चिनी वायुदलाच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. रडार आणि हवाई सुरक्षा नेटवर्कची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. तसेच स्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचे वायुदल प्रमुखांनी सांगितले आहे.
भविष्यातील युद्धक्षेत्र बदलत असल्याने आम्ही भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करत आहोत. वायुदल भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
युक्रेन-रशिया युद्धाचा उल्लेख
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 7 महिने झाले असून आतापर्यंत आम्हाला कुठल्याही सुटय़ा भागांची कमतरता जाणवलेली नाही. आम्ही मागील काही वर्षांमध्ये स्वदेशीकरणाला प्रोत्साहन दिले असून देशातूनच 62 हजार स्पेयर पार्ट्स खरेदी केले आहेत. याचमुळे आमची युक्रेन आणि रशियावरील निर्भरता कमी झाल्याचे वायुदलप्रमुख चौधरींनी सांगितले आहे.
वायुदल दिन सोहळा चंदीगडमध्ये
8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुदल दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा वायुदल दिन सोहळा नवी दिल्लीऐवजी चंदीगडमध्ये पार पडणार आहे. देशाच्या विविध भागातील लोकांना अशाप्रकारच्या सोहळय़ांमध्ये भाग घेता यावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.









