उत्तराखंडमध्ये सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
वृत्तसंस्था /देहराडून
उत्तराखंडमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. उत्तराखंडच्या ऊद्रप्रयाग जिह्यात मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे ऊद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी रविवारी सांगितले. सद्यस्थितीत सोनप्रयाग येथे यात्रा थांबवण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 5828 प्रवासी सोनप्रयागहून केदारनाथला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एकंदर परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद होण्यासह नुकसानीच्या घटना राज्यभरात घडलेल्या दिसून येत आहेत. विशेष म्हणजे डेहराडूनमध्ये पावसामुळे 9 मार्ग बंद झाले आहेत. एक राज्य महामार्ग आणि नऊ ग्रामीण रस्त्यांवरही दरडी कोसळण्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत मुसळधार पाऊस पडत असल्याने वातावरणात बराच फरक पडला आहे. रविवारपासून देहराडूनसह सात जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे देहराडूनच्या हवामान केंद्राचे संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले.









